प्राग मास्टर्स : प्रज्ञानंदचा सामना आज अमेरिकेच्या शँकलँडशी
वृत्तसंस्था/ प्राग
नवीन यादीनुसार जागतिक क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च म्हणजे 8 व्या क्रमांकावर पोहोचलेला ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद मंगळवारी विश्रांतीच्या दिवसानंतर आज प्राग मास्टर्सच्या सहाव्या फेरीत अमेरिकन सॅम शँकलँडचा सामना करेल. सहकारी अरविंद चिदंबरमसह अव्वल स्थानावर असलेल्या प्रज्ञानंदने मागील सामन्यात बराच काळ अरविंदचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सामना बरोबरीत सुटला.
दोघांचे आता प्रत्येकी 3.5 गुण झाले आहेत. अरविंदने दोन विजय नोंदविलेले असून स्पर्धेतील दुसऱ्या विजयानंतर तो स्वत:ही आश्चर्यचकीत झाला. त्याने स्पर्धेत अव्वल मानांकित चीनच्या वेई यीलाही हरवून दाखवलेले आहे. तो आता प्रतिष्ठित खेळाडूंच्या वर्तुळात पोहोचला असून त्याला आता पुढच्या फेरीत व्हिएतनामच्या अनुभवी क्वांग लेईम लेचा सामना करावा लागेल.
या दोन्ही भारतीय खेळाडूंनंतर प्रत्येकी 2.5 गुणांसह चार खेळाडू आहेत. सर्वांत धोकादायक खेळाडू वेई यी आहे, ज्याने पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये दोन पराभवांसह सुऊवात केली आणि नंतर सलग दोन सामने जिंकून त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचे संकेत दिले. अनीश गिरी आणि क्वांग लेईम यांनी आतापर्यंत पाचही सामने बरोबरीत सोडवण्याचा मान मिळवला आहे, तर विन्सेंट कीमरने दोन गमावले आहेत, एक बरोबरीत सोडवला आहे आणि पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत.