प्रज्ञानंद संयुक्त तिसरा, गुकेश सहावा तर अलीरेझा विजेता
वृत्तसंस्था
झाग्रेब (क्रोएशिया)
ग्रँडमास्टर आर. प्राज्ञानंदने सोमवारी येथे झालेल्या ग्रँड बुद्धिबळ टूरच्या क्रोएशियन टप्प्यात अंतिम दिवशी दमदार पुनरागमन करत संयुक्त तिसरे स्थान पटकावले. फ्रान्सच्या फिरौजा अलीरेझा 23.5 गुणांसह विजेतेपद मिळवले.
प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवून फ्रान्सच्याच मॅक्सिम वॉशियर-लाग्रेव्हसोबत संयुक्त तिसरे स्थान मिळविले. या भारतीय खेळाडूने अंतिम दिवसाची सुरुवात व्हिन्सेंट कीमरविरुद्धच्या पराभवाने केली. परंतु त्यानंतरच्या आठ सामन्यांत 6 गुण मिळवून चांगली कामगिरी केली. त्याला आपल्याच देशाच्या डी. गुकेशकडूनही पराभव पत्करावा लागला, मात्र प्रज्ञानंदने अलीरेझाला पराभूत करण्यात यश मिळवले. पहिल्या दिवशी ब्लिट्झ प्रकारात 9 पैकी 8 गुण मिळवून शानदार सुरुवात करणाऱ्या अलीरेझासाठी अंतिम दिवस निराशाजनक ठरला. त्याला केवळ 5 गुण मिळवता आले, ज्यामुळे उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला 23.5 गुणांसह त्याच्या बरोबरीला येण्याची संधी मिळाली. यामुळे टायब्रेकरची वेळ आली, ज्यामध्ये पहिले दोन सामने बरोबरीत सुटले. त्यानंतर आर्मागेडन फेरीत फ्रान्सच्या खेळाडूने अब्दुसत्तोरोव्हशी सामना बरोबरीत सोडवला आणि विजेतेपद पटकावले. कारण काळ्या मोहऱ्यांनी खेळताना त्याला केवळ बरोबरीची आवश्यकता होती. जर्मनीच्या कीमरने एकूण 20 गुण मिळवले. तो विद्यमान जागतिक विजेता गुकेशपेक्षा 1.5 गुणांनी पुढे राहिला आणि गुकेश सहाव्या स्थानावर आला. डच ग्रँडमास्टर अनिश गिरी 17 गुणांसह सातव्या तर डियाक बोगदान डॅनियल 15 गुणांसह आठव्या स्थानावर राहिले.
10 खेळाडूंच्या स्पर्धेत हॉलंडचा जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट 12.5 गुणांसह नवव्या, तर स्थानिक खेळाडू इव्हान सारिक केवळ सात गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. अलीरेझाला त्याच्या कामगिरीसाठी 47,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. नोदिरबेकला 42,000 डॉलर्स मिळाले तर प्रज्ञानंद आणि वॉशियर-लाग्रेव्ह यांनी प्रत्येकी 25,000 डॉलर्सची रक्कम विभागून मिळाली.
ग्रँड बुद्धीबळ टूरच्या गुणतालिकेत अमेरिकेचा फॅबियानो कारुआना 20 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर कीमर 19 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तो अलीरेझापेक्षा एका गुणाने पुढे आहे. प्रज्ञानंदसाठी पुढील वाटचाल आव्हानात्मक असेल. सध्या 11.5 गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ‘जीसीटी‘च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी या भारतीय खेळाडूला अधिक दमदार कामगिरी करावी लागेल. या टूरमधील पुढील दोन स्पर्धा सेंट लुईस येथे होणार आहेत. यामध्ये एक ‘रॅपिड आणि ब्लिट्झ‘ स्पर्धा आणि त्यानंतर एक ‘क्लासिकल‘ स्पर्धा आयोजित केली जाईल.
गुणतालिका-1. फिरौजा अलीरेझा (फ्रान्स) 23.5; 2. नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (उझबेकिस्तान) 23.5; 3. मॅक्सिम वॉशियर-लाग्रेव्ह (फ्रान्स) 21.5; आर. प्रज्ञानंद (भारत) 21.5; 5. व्हिन्सेंट कीमर (जर्मनी) 20; 6. डी. गुकेश (भारत) 18.5; 7. अनिश गिरी (नेदरलँड्स) 17; 8. डीक बोगदान-डॅनियल (रोमानिया) 15; जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट (नेदरलँड्स) 12.5; 10. इव्हान सारिक (क्रोएशिया) 7 गुण.