For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कँडिडेट्स : शानदार सुरुवातीत प्रज्ञानंदची गिरीवर मात

06:10 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
कँडिडेट्स   शानदार सुरुवातीत प्रज्ञानंदची गिरीवर मात
Advertisement

वृत्तसंस्था  / पाफोस-सायप्रस :

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने सायप्रसच्या पाफोस येथे झालेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत डच ग्रँडमास्टर अनिश गिरीचा बचाव भेदत शानदार सुऊवात केली. स्पर्धेच्या अत्यंत घडामोडींनी भरलेल्या पहिल्या दिवशी विश्वचषक विजेता जावोखिर सिंदारोव्हने आपल्या उत्कृष्ट डावपेचांचा वापर करून रशियन आंद्रे एसिपेंकोवर मात केली, तर प्रबळ दावेदार असलेला अमेरिकेचा फॅबियानो काऊआना हा सहकारी अमेरिकन हिकारू नाकामुरावर विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.

आठ खेळाडूंच्या डबल राऊंड-रॉबिन स्पर्धेतील अन्य सामना जर्मनीचा मॅथियास ब्लूबाम आणि चीनचा वेई यी यांच्यात होणार आहे. महिलांच्या विभागात भारतीय ग्रँडमास्टर आणि महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुखने शेवटच्या क्षणी बदली खेळाडू म्हणून आलेल्या युक्रेनच्या अॅना मुझीचुकसोबतचा सामना बरोबरीत सोडवला आणि आर वैशालीने काही तणावपूर्ण क्षणांवर मात करून कझाकस्तानच्या बिबिसारा असौबायेव्हा हिच्यासोबत गुण विभागून घेतले.

Advertisement

महिलांच्या स्पर्धेत खरे तर सर्व सामने अनिर्णित राहिले. रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाने तिची सहकारी कटेरिया लाग्नोसोबत सामना अनिर्णित राखला आणि जिनर झू व झोंगयी टॅन या चिनी खेळाडूंमधील सामनाही अनिर्णित राहिला. कँडिडेट्स स्पर्धेपूर्वी गेल्या काही महिन्यांपासून प्रज्ञानंद संघर्ष करत होता, पण आता त्याने शानदार पुनरागमन केले आहे. गिरी हा सर्वांत सातत्यपूर्ण आणि भक्कम खेळाडूंपैकी एक आहे, पण प्रज्ञानंदला रोखणे त्याला शक्य झाले नाही.

हा एक मानसिक तणावाचा सामना होता, कारण काळ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या गिरीच्या सिसिलियन डिफेन्सला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय खेळाडूने ग्रां प्रि अटॅकने सुऊवात केली. या सुऊवातीचा अपेक्षित परिणाम झाला की नाही हा वादाचा विषय आहे, पण त्यामुळे प्रज्ञानंदला वेळेच्या बाबतीत आघाडी मिळाली. गिरीने मधल्या टप्प्यात सुऊवातीला चातुर्य दाखवून पारडे सम पातळीवर आणले असले, तरी वेळ कमी असताना गिरीच्या हातून अंतिम टप्प्यात चूक झाली. यानंतरचा खेळ प्रज्ञानंदसाठी सोपा होता.

Advertisement
Tags :

.