For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञानंद अनिश गिरीकडून पराभूत, दिव्या संयुक्तरीत्या आघाडीवर

06:55 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञानंद अनिश गिरीकडून पराभूत  दिव्या संयुक्तरीत्या आघाडीवर
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

पाफोस, सायप्रस : कँडिडेट्स स्पर्धेत भारताची बुद्धिबळ खेळाडू दिव्या देशमुखने एक शानदार पुनरागमन करत बरोबरीत निश्चित संपणार असे वाटणारा सामना विजयात बदलून संयुक्त आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, आर. प्रज्ञानंद आठव्या फेरीत डच ग्रँडमास्टर अनिश गिरीकडून पराभूत झाल्याने त्याच्या विजेतेपदाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे सायप्रसमधील पाफोस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून तो जवळपास बाहेर पडला आहे.

महिलांच्या गटात विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने आदल्या दिवशी आघाडीवर असलेल्या अॅना मुझीचुकवर मात करताना बचाव करण्यास कठीण अशा स्थितीतून झेप घेतली आणि आपली गुणसंख्या 4.5 वर पोहोचवून युक्रेनियन खेळाडूसह चार खेळाडूंसोबत संयुक्त आघाडी घेतली. देशमुखने झुंज देत स्थिती बरोबरीत आणली आणि त्यानंतर आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या एका अनपेक्षित चुकीचा फायदा घेत एक महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

Advertisement

दुसरी भारतीय खेळाडू आर. वैशालीने कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेव्हा हिच्यासोबतचा सामना बरोबरीत सोडवला आणि आठ सामन्यांनंतर 4.5 गुणांसह ती देशमुख, युक्रेनची कॅटेरिना लाग्नो, चीनची झू जिनर आणि मुझीचुक यांच्यासोबत आघाडीवर आली आहे. जिनरने तिची चिनी सहकारी टॅन झोंगयी हिच्या आशांना धक्का देत 4.5 गुण मिळवल्याने ही स्पर्धा आता पूर्णपणे खुली झाली आहे, तर कॅटेरिनाने तिची सहकारी रशियन खेळाडू अलेक्झांड्रा गोर्याचकिनाला पराभूत केले.

ज्या दिवशी उझबेक जावोखिर सिंदारोव्हने खुल्या विभागात रशियाचा तळाशी असलेला खेळाडू आंद्रे एसिपेन्कोसोबतचा सामना बरोबरीत सोडवून आपली आघाडी मजबूत केली त्याच दिवशी पहिल्या फेरीत गिनवरील एकमेव विजय नोंदविलेल्या प्रज्ञानंदला वरवर पाहता दोन्ही बाजूंनी पारडे समान प्रमाणात झुकलेल्या सामन्यात काही सोप्या डावपेचांना बळी पडावे लागले आणि त्याने स्पर्धेतील आपला दुसरा सामना गमावला.

सिंदारोव्हने शक्य असलेल्या आठपैकी 6.5 गुण मिळवले आहेत आणि तो जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे, कारण 7 लाख अमेरिकी डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत अजून सहा फेऱ्या बाकी असताना त्याची आघाडी आता दोन गुणांची झाली आहे. याच स्पर्धेतून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या अंतिम सामन्यासाठी विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशच्या आगामी आव्हानवीराची निवड केली जाईल.

सिंदारोव्हच्या पाठोपाठ गिरी आणि अमेरिकेचा फॅबियानो काऊआना आहेत, जे दोघेही दोन गुणांनी मागे आहेत आणि आघाडीवर असलेल्या खेळाडूशी बरोबरी करण्यासाठी त्यांना चमत्काराची गरज आहे. प्रज्ञानंद, चीनचा वेई यी, जर्मनीचा मॅथियास ब्लूबाउम आणि हिकारू नाकामुरा हे सर्व जण प्रत्येकी 3.5 गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. हे गुण तळाच्या स्थानावर असलेल्या एसेपेन्कोच्या गुणांपेक्षा पूर्ण एका गुणाने अधिक आहेत.

Advertisement
Tags :

.