For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञानंदची ‘ग्रँड चेस टूर’च्या अंतिम फेरीत धडक

06:45 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञानंदची ‘ग्रँड चेस टूर’च्या अंतिम फेरीत धडक
Advertisement

वृत्तसंस्था, मिसुरी : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरवर 19-9 असा दणदणीत विजय मिळवत ‘ग्रँड चेस टूर’च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेचा फॅबियानो काऊआना याच्याशी होईल, जो या स्पर्धेचा गतविजेता आहे आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

Advertisement

दुसरा ‘क्लासिकल’ सामना जिंकल्यामुळे कमी कालावधीचे सामने खेळल्या गेलेल्या अंतिम दिवसाची सुऊवात करताना या भारतीय खेळाडूकडे सहा गुणांची मोठी आघाडी होती. त्याने कीमरचा सलग ‘रॅपिड’ सामन्यांमध्ये पराभव करून 17-3 अशी अभेद्य आघाडी घेतली आणि अंतिम फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले. त्यानंतर ‘ब्लिट्झ’ प्रकारातील पहिल्या सामन्यातील विजयामुळे त्याची एकूण गुणसंख्या 19 वर पोहोचली. नियमांनुसार सर्व सामने खेळणे अनिवार्य असल्यान, कीमरने शेवटचे तीन ‘ब्लिट्झ’ सामने जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सामन्याचा निकाल त्याच्या हातातून निसटला होता.

काऊआना हा खेळाच्या जलद प्रकारातील तज्ञ मानला जात नाही, परंतु त्याने हा समज चुकीचा असल्याचे या स्पर्धेत सिद्ध केले. ‘ब्लिट्झ’ सामन्यांमधील आपल्या कौशल्याच्या जोरावर काऊआनाने वेस्ली सोवर 18-9 असा विजय मिळवला आणि विजयाबाबत कोणतीही अनिश्चितता ठेवली नाही. अंतिम फेरी ही 4,50,000 अमेरिकन डॉलर्सची इनामे कुणाला प्राप्त होतील ते निश्चित करतील. यातील 2 लाख डॉलर्स विजेत्यासाठी आणि 1 लाख 25 हजार डॉलर्स उपविजेत्यासाठी आहेत. जरी काऊआना विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात असला, तरी प्रज्ञानंदमध्ये सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे.

Advertisement

तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात कीमरचा सामना अमेरिकेच्याच वेस्ली सो याच्याशी होईल. या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडूंना पुढील वर्षीच्या ‘ग्रँड चेस टूर’साठी थेट निमंत्रण मिळेल.

Advertisement
Tags :

.