प्रज्ञानंद संयुक्त तिसरा, फेडोसीव्ह विजेता
वृत्तसंस्था/ वारसॉ, पोलंड
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूरवरील सुपरबेट रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले तर स्लोव्हेनियाच्या व्लादिमिर फेडोसीव्हने अपेक्षेप्रमाणे जेतेपद पटकावले.
ब्लिट्झ विभागात भारताच्या अरविंद चिदंबरमच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे जीसीटीच्या एकूण तक्त्यात त्याला संयुक्त सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जीसीटीमध्ये तो पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. फेडोसीव्ह शेवटच्या दिवशी उतरला तेव्हा तो तब्बल 3.5 गुणांनी आघाडीवर होता. त्यामुळे त्याचे जेतेपद निश्चित झाले होते. ब्लिट्झ विभागात त्याला अडवणारा कोणीच नाही, असे दिसून आले. त्याने 9 पैकी 7.5 गुण या विभागात मिळविले. त्याला जेतेपदाचे 40,000 डॉलर्सचे बक्षीस मिळाले. त्याने एकंदर 36 पैकी 26.5 गुण मिळविले. रॅपिड विभागात एक विजयास 2 तर ब्लिट्झमध्ये एका विजयास एक गुण दिला जातो.
फ्रान्सच्या मॅक्झिम वॉशियर लॅग्रेव्हने 21.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले तर प्रज्ञानंदने एकूण 20.5 गुण मिळविले. जीसीटी क्रमवारीत वॉशियर लॅग्रेव्ह आघाडीवर असून प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानावर आहे. वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या फेडोसीव्हला या स्पर्धेसाठी कायमचे निमंत्रित होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. वॉशियर लॅग्रेव्हला 30 हजार डॉलर्स तर प्रज्ञानंदला 25 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.
अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनने 20 गुण घेत चौथे, फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझाने 18.5 गुणांसह पाचवे, रोमानियाच्या डीयाक बॉग्डन डॅनियनले 18 गुणांचे सहावे, स्थानिक खेळाडू डुडा जान क्रीस्तॉफने अरविंदसह 17 गुण घेत संयुक्त सातवे, रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूने 11 गुणांसह नववे बल्गेरियाच्या व्हेसेलिन टोपालोव्हने 10 गुणांसह शेवटचे दहावे स्थान मिळविले.
जीसीटीमधील पुढील स्पर्धा बुचारेस्ट येथे पहिली क्लासिकल स्पर्धा होईल, त्यात टूरवरील कायमचे नऊ खेळाडू व एक वाईल्ड कार्ड खेळाडू यांचा समावेश असेल. भारतातर्फे वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश, प्रज्ञानंद त्यात सहभागी होतील. 7 मेपासून ही स्पर्धा सुरू होईल.