प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला वेग; अलिबागजवळून आणखी दोन आरोपी अटकेत
ठाणे | प्रतिनिधी : मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून ठाणे गुन्हे शाखेने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांना अलिबागजवळील एका डेअरीतून ताब्यात घेण्यात आले.
29 सप्टेंबर रोजी पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची नऊ पथके कार्यरत करण्यात आली.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, निखिल यादव हा पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळील खाद्यपदार्थांच्या गाडीवर काम करत होता. तर नितेश पवार याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघे अलिबाग परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात यापूर्वी पप्या शिंदे याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येचा नेमका उद्देश, कटामागील सूत्रधार आणि इतर सहभागी व्यक्तींबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी काही राजकीय व्यक्तींवर या हत्येमागे असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून पोलिस तपासातूनच त्याबाबतचे तथ्य स्पष्ट होणार आहे.