प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाण्यात राजकीय संघर्ष तीव्र; ठाकरे गटाचा मोर्चा रद्द, शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबरच्या रात्री जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींसह कथित सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे आणि घोडबंदर रोड परिसरात आंदोलन करून या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पूर्णेकर यांच्या पत्नीच्या आरोपांवरून राजकीय वाद
पूर्णेकर यांच्या पत्नीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदे यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आरोपांची सत्यता सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तीने पक्षातील पदापासून दूर राहणे योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“त्यांच्यावर आरोप होत असतील, तर पक्षाचे जे काही पद आहे, ते बाजूला काढून ठेवले तर ते अतिशय योग्य होईल,” असे आपण एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाचा पक्षांतर्गत राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांची भेट घेणार
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राजन विचारे हे पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कारवाईबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्याचेही नियोजन आहे.
मात्र, सर्वपक्षीय मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे ठाकरे गट आता पुढील भूमिका काय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिंदे गटाकडूनही जमवाजमव
दुसरीकडे, शिंदे गटाने ठाण्यातील आनंद आश्रम येथे पक्षाचे खासदार, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दुपारी 2.30 वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडूनही शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून रात्री 8 वाजता शांततेत कँडल मार्च काढून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हत्या प्रकरणातील तपास, कथित सूत्रधारांवरील कारवाईची मागणी आणि दोन्ही शिवसेना गटांतील आरोप-प्रत्यारोप यामुळे ठाण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणातील पुढील पोलिसी कारवाई आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.