For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; वडिलांच्या हत्येचे पुरावे दाखवले; ‘मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही’, न्यायाचे आश्वासन

02:05 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट  वडिलांच्या हत्येचे पुरावे दाखवले  ‘मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही’  न्यायाचे आश्वासन
Advertisement
ठाणे : ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राम पूर्णेकर यांनी भेटीनंतर दिली.

या भेटीदरम्यान राम पूर्णेकर यांनी हत्या प्रकरणाशी संबंधित घडामोडी, ठाण्यातील परिस्थिती आणि तपासासंदर्भातील आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. तसेच, आपल्याकडे असलेले महत्त्वाचे पुरावेही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दाखवले. प्रदीप पूर्णेकर यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली, त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे राम यांनी सांगितले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा शांत वातावरणात झाली. या चर्चेला बंद दाराआड झालेल्या बैठकीचे स्वरूप नव्हते. ठाण्यात नेमके काय घडत आहे, या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली आणि कुटुंबीयांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची संपूर्ण माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली, असे राम पूर्णेकर यांनी स्पष्ट केले.

या हत्या प्रकरणाला महिना उलटून गेला असतानाही पाच आरोपी अटकेत असल्याचे त्यांनी सांगितले. तपासातील पुढील कारवाई आणि न्याय मिळण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा ठेवली आहे. 29 सप्टेंबरपासून आजपर्यंत या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापासून आपल्याला रोखण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर दावाही राम पूर्णेकर यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ देऊ नये, यासाठी अनेक फोन आले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर थेट मांडणे महत्त्वाचे असल्याने आपण ही भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमकी काय होती हत्या?

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पाच हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयात घुसून पिस्तुलातून सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी चार गोळ्या पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले. त्यावेळी प्रदीप पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर या प्रकरणाच्या तपासाला कोणती दिशा मिळते आणि दोषींवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे पूर्णेकर कुटुंबीयांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.