For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण; पप्या शिंदेला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी; हत्येच्या कटातील सहभागाचा पोलिसांचा दावा; चार आरोपी फरार, मीरा रोडहून महिला व पुरुष ताब्यात

01:48 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण  पप्या शिंदेला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी  हत्येच्या कटातील सहभागाचा पोलिसांचा दावा  चार आरोपी फरार  मीरा रोडहून महिला व पुरुष ताब्यात
Advertisement

ठाणे | प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला पप्या शिंदे हा हत्येच्या कटात सहभागी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या कार्यालयात हल्ला झाला होता. गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पप्या शिंदेसह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार आरोपी अद्याप फरार आहेत.

हल्ल्यावेळी पप्या शिंदे कार्यालयातच

पोलिसांच्या तपासानुसार पप्या शिंदे हा पूर्णेकरांचा पूर्वीचा मित्र होता. मागील काही दिवसांपासून तो पुन्हा पूर्णेकरांच्या संपर्कात होता. हल्ल्याच्या वेळी तो पूर्णेकरांच्या कार्यालयात उपस्थित होता आणि हल्ल्यानंतर जखमी पूर्णेकरांना रुग्णालयात नेण्यातही तो सहभागी झाला होता. तपासादरम्यान त्याच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Advertisement

चार आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणातील अन्य चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत आहेत. फरार आरोपी नेमके कुठे आहेत, त्यांना कोणी आश्रय दिला आहे आणि हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, मीरा रोड येथून एका महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे फरार आरोपींच्या संपर्कात होते का, तसेच त्यांच्याकडून फरार आरोपींबाबत काही महत्त्वाची माहिती मिळते का, याचा तपास केला जात आहे. त्यांना ठाणे शहर गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-5 येथे आणण्यात आल्याची माहिती आहे.

पप्या शिंदेची पोलीस कोठडी 5 ऑक्टोबरपर्यंत असल्याने या कालावधीत त्याच्याकडून हत्येच्या कटाची पार्श्वभूमी, इतर आरोपींची भूमिका आणि फरार साथीदारांबाबत माहिती मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement

.