Prada Team At Kolhapur: 'कोल्हापूरी'च्या कलाकूसरीवर Prada फिदा, कारागीरांचे कौतुक, अधिकारी काय म्हणाले?
चप्पल कसे बनते याची माहिती घेण्याची उत्सुकता असल्याचे स्पष्ट केले
कोल्हापूर : जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची माहिती घेण्यासाठी इटलीच्या प्राडा कंपनीचे अधिकारी कोल्हापुरात आले आहेत. मंगळवारी त्यांनी जवाहरनगर, सुभाषनगर, मोरेवाडी, कंदलगाव, कागल येथील कारखान्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी कोल्हापुरी चप्पल कसे बनते? याची सखोल माहिती घेतली.
तसेच येथील कारागिरांचे कौतुक करत हाताने केलेल्या कलाकुसरीवर फिदा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
प्राडा कंपनीचे सहा अधिकारी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापुरात दाखल झाले. सर्वप्रथम त्यांना चप्पल कसे बनते याची माहिती घेण्याची उत्सुकता असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर त्यांनी जवाहरनगर, मोरेवाडी येथील चप्पल तयार कारागिरांची भेट घेतली. चप्पलमधील बारीकसारीक कलाकुसरी न्याहाळल्या. सुरवातीपासून चप्पल पूर्ण तयार होण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेची त्यांनी सखोल माहिती घेतली.
प्रारंभी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉ मर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत केले.
यानंतर त्यांनी थेट जवाहरनगर, सुभाषनगर येथे कारागिरांशी चर्चा केली. हाताने तयार केल्या जाणाऱ्या चप्पलच्या वेण्यांचे बारकाईने निरीक्षण केले. राजर्षी शाहू महाराजांच्या चप्पलबद्दल माहिती घेत ऐतिहासिक आढावा घेतला. कोल्हापुरी चप्पलचा दर्जा, कलाकुसर यांची नेमकी सांगड कशी घातली जाते यावर चर्चा केली.
पथकामध्ये प्राडाचे फुटवेअर विभाग संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकींग मॅनेजर डॅनिएल कोंटू, बाह्या सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली, रॉबर्टो पोलास्ट्रेली यांचा समावेश होता. या भेटीमुळे कारागिरांच्या कलाकुसरीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळणार असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.
व्यावसायिक भूपाल शेटे म्हणाले, कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या कारागिरांना जागतिक पातळीवरील रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे. देश विदेशातही कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळणार आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पोवार यांनी कोल्हापुरी चप्पलबद्दल माहिती सांगितली. यावेळी राजन सातपुते, शुभम सातपुते, बाळासाहेब गवळी, सुनील लोकरे, परशराम सातपुते, शिवाजी माने आदी उपस्थित होते.
प्राडाकडून दिलगीरी
इटलीच्या प्राडा ब्रँडने मागील महिन्यात एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला. याठिकाणी कोल्हापुरी चप्पलची 1 लाख 20 हजार किंमतही लावली होती. मात्र, प्राडाने भारतीय कारागिरांना कोणतेही श्रेय दिले नाही. टिकाऊ आणि लवचिकता अशी ख्याती असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलची कॉपी केल्याचा आरोप या कंपनीवर झाला.
यानंतर देशासह जागतिक पातळीवर प्राडावर टीका झाल्या. सोशल मीडियावरही ट्रोल करण्यात आले होते. यानंतर सदर कंपनीने कोल्हापुरी चप्पलची कॉपी केल्याचे कबूल करत जाहीर माफीही मागितली होती.
लिडकॉमचे कार्यालय बंद.. व्यावसायिकांकडून निषेध
लिडकॉमचे कार्यालय बंद असल्यामुळे प्राडाला लिडकॉम कार्यालयाला भेट देता आली नाही. शासकीय परवानगी नसल्यामुळे भेट देता येत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. प्राडाचे शिष्टमंडळ कोल्हापुरात येणार असल्याची माहिती असूनही कार्यालय बंद ठेवल्याबद्दल कारागिर, व्यावसायिकांनी निषेध केला.