स्थिर मनाने योगाभ्यास केल्यावर मनाला उत्तम शांती मिळते
भगवंत म्हणाले, ईश्वर आपला पाठीराखा आहे आणि तो जे घडवून आणेल ते आपल्या हिताचेच असेल अशी खात्री झाली की, मनुष्य प्रपंचाच्या काळजीतून मुक्त होतो. त्याला धीर मिळतो आणि त्या धैर्याचा उपयोग करून तो त्याचे चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करतो पण माणसाला गेले अनेक जन्म प्रपंचाची काळजी करण्याची सवय लागलेली असते ती इतक्या सहजासहजी त्याच्या मनातून जात नाही पण म्हणून माणसाने प्रयत्न सोडू नयेत. त्याचे मन आत्मविचारापासून बाजूला गेले की, ते जेथे धाव घेत असेल तेथून खेचून काढून त्याला आत्मविचारात गुंतवावे. असा जर निश्चय केला तर मन त्याप्रमाणे वागेल. जर येवढ्याने ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. मोकळे सोडल्यावर ते जेथे जेथे जाईल तेथे त्याला कायम टिकणारे सुख न मिळाल्याने त्याचा आत्मस्वरुपावर लक्ष केंद्रित करून कायम टिकणारे सुख मिळते ह्याची खात्री पटेल आणि आपोआपच ते आत्मस्वरूपावर स्थिर होईल. अर्थात मनाची ठेवण अशी सहज बदलत नसल्याने त्यात परिवर्तन होण्याला दीर्घकाळ लागतो.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, याप्रमाणे स्थिर मनाने योगाभ्यास केल्यावर मनाला उत्तम शांती मिळते. रजोगुणाचा प्रभाव कमी होतो. तो पापपुण्यविरहित होऊन ब्रह्मस्वरूप झाल्याने त्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होते.
विकारांसह ते ज्याचे शमले मन निर्मळ । झाला ब्रह्मची तो योगी पावला सुख उत्तम ।।27।।
ताब्यात नसलेले चंचल मन हेच दु:खाचे कारण आहे असं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहेच. ते जर स्थिर करता आले तर माणसाला कायम सुख मिळू शकते म्हणून ह्या अध्यायात ते स्थिर कसे करायचे हा मुद्दा भगवंतांनी केंद्रस्थानी ठेवला आहे. माउली म्हणतात, माणसाच्या इच्छा संपल्या की, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख ह्या विकारांतून त्याचे मन मुक्त होते. मुक्त झालेले मन स्थिर असल्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येते. एकदा ते आत्मस्वरुपाजवळ आले की, त्यातून मिळणाऱ्या सुखाची बरोबरी नाशवंत वस्तूपासून मिळणारे जगातले कोणतेही सुख करू शकत नाही हे अनुभवाने त्याला समजते. त्याच्या हेही लक्षात येते की, आत्मस्वरुपाशी एकरूप झाल्यावर मिळणाऱ्या सुखाला अंत नसतो. त्याउलट समोर दिसणाऱ्या वस्तूतून मिळणारे सुख शेवटी क्लेशदायकच असते. ह्या अनुभवाने ते आत्मस्वरूपाशी इतके एकरूप होते की, ते स्वत: आत्मरूप बनून जाते. असे झाले की, ते ब्रह्माशी तादाम्य पाऊन त्रैलोक्य त्या ऐक्याच्या तेजाने प्रकाशित झाल्याची अनुभूती त्याला येत राहते. आत्मस्वरूपी चित्त लय पावले की, संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, या प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी दोषविरहित होतो व सुखाने ब्रह्मसाक्षात्काररूपी आत्यंतिक सुख भोगतो.
आत्म्यास नित्य जोडूनी ह्यापरी दोष जाळूनी । सुखे चि भोगतो योगी ब्रह्मानंद अपार तो ।।8।।
माउली म्हणतात, स्वत: कर्ते आहोत समजुतीतून इच्छा पूर्ण करायच्या नादात मनुष्य अनेक गोष्टी करायचा संकल्प करतो व स्वत:ला त्यात गुंतवून घेतो.