निरोगी, आनंदमयी जीवनासाठी योग करा!
आंतरराष्ट्रीय योगदिनी संदेश : राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन
त. भा. प्रतिनिधी
पणजी : ‘आरोग्य, ज्ञान आणि जागतिक शांततेसाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
योग आपल्या आयुष्यात अधिक वर्षांची भर घालतो आणि त्या वर्षांमध्ये खरा जिवंतपणा भरतो. यंदाचा योग दिन सर्वांगीण आरोग्य, भावनिक समतोल आणि जागतिक सलोखा यांवर लक्ष केंद्रित करणारा आहे.
विद्यमान परिस्थितीत नित्याच्या तणावग्रस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य हा सर्वात मोठा ठेवा ठरत आहे. त्याला योगाची जोड मिळाल्यास रोजचा सुसंवाद आणि आरोग्य लाभण्यात, सजगतेने जगण्यात मदत होते. योगामुळे आपल्याला शांततेचा श्वास घेताना तणाव बाहेर सोडून देण्याची शक्ती प्राप्त होते. त्यातून शरीर, मन व आत्मा यांच्यात समतोल साधणे शक्य होते. तणाव कमी करणे, एकाग्रता वाढविणे तसेच आरोग्य सुधारण्यातही साहाय्यक बनते.
सध्या देशभरात मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यासारखे आजार प्रचंड गतीने वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या जीवनातील किमान काही वेळ तरी स्वत:च्या आरोग्यासाठी देणे क्रमप्राप्त ठरत असते. अशावेळी आजच्या योग दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, अशा विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात प्रत्येकाने स्वप्रेरणेने सहभागी होणे आवश्यक आहे, असे सरकारी संदेशातून म्हटले आहे.