नॅशनल रॉ पॉवरलिफ्टींगमध्ये प्रचितीला सुवर्णपदक
विटा :
पुणे येथे झालेल्या नॅशनल रॉ पॉवर लिफ्टींग स्पर्धेत लेंगरेच्या प्रचिती विरल कदम-सावंत हिने सुवर्णपदक पटकावत उत्तुंग यशाला गवसणी घातली. तिची आशिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या वर्षातील तिचे हे तिसरे यश आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने प्रचिती कदम हिने अल्पावधीत महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला आहे. प्रचिती सध्या 67 किलो वजनी गटातून या प्रकारात नशिब आजमावत आहे.
पुणे येथील महाराष्ट्र मंडळात वर्ल्ड रॉ पावरलिफ्टींग फेडरेशनशी संलग्न युनायटेड पॉवरलिफ्टींग फेडरेशनच्या चौथ्या राष्ट्रीय रॉ पावरलिफ्टींग आणि आशियायी पात्रता चाचणी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये मुळच्या खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील असणाऱ्या प्रचिती विरल कदम-सावंत हिने 67 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर आणि मास्टर्स अशा चार विभागात स्पर्धा झाल्या. देशभरातील तब्बल 320 स्पर्धकांनी पात्रता चाचणीत सहभाग घेतला. यामध्ये प्रचितीने 67 किलो वजनी गटात सहभाग नोंदवला.
प्रचितीने पहिल्याच प्रयत्नात स्कॉटस्मध्ये 135 किलो, बेंचपास मध्ये 60 किलो आणि डेडलिफ्टमध्ये 140 किलो असे एकुण 335 किलोग्रॅम वजन उचलत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. तिची आशिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने प्रचितीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी ठाणे येथे झालेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवले होते. तर आंध्रप्रदेशातील राजमहेंद्री जिल्ह्यातील स्पर्धेतही तिने याच वर्षी आपली चुणूक दाखवली आहे.
प्रचिती ही राजमहेंद्री येथील सराफ व्यवसायिक जगन्नाथ बोबडे-कदम यांची स्नूषा तर लेंगरेचे माजी सरपंच प्रशांत सावंत यांची पुतणी आहे. लग्नानंतरही तिने पॉवरलिफ्टींग सारख्या साहसी खेळात आपले भवितव्य करण्याचा निर्णय घेतला. तिला पती विरल, वडील प्रविण सावंत यांनी प्रोत्साहन दिले. तिच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.