हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका प्रचला आमोणकर यांची यंदाच्या ‘पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कारासाठी’ निवड
पणजी : गोव्यातील सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका प्रचला आमोणकर यांची यंदाच्या ‘पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
प्रचला आमोणकर या आग्रा घराण्याच्या गायिका असून त्यांनी पंडित बबनराव हळदणकर, डॉ. अलका देव-मारुळकर आणि डॉ. अरुण काशळकर यांच्याकडून संगीताचे उच्च शिक्षण घेतले आहे. गोवा कला अकादमीतून संगीताचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स’ (MPA) ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवली आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ‘ए ग्रेड’ कलाकार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोवा कला अकादमीत दीर्घकाळ संगीत प्रशिक्षक आणि व्याख्याती म्हणून कार्यरत राहून त्यांनी अनेक युवा संगीतकारांना मार्गदर्शन केले आहे.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन एक पाखरू’ या मराठी संगीत अल्बममध्येही त्यांनी गायन केले आहे. संगीतकार सुनील केरकर आणि गायक शंकर महादेवन यांच्यासोबत त्यांनी सहगायन केले. ‘मन माझे’, ‘दाटून आले’, ‘ये सांग प्रिये’ आणि ‘मनाचा हा गुंता’ यांसारख्या गीतांमधून त्यांच्या गायनाची वेगळी छाप उमटली आहे.
कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाचा ‘युवा सृजन पुरस्कार’ मिळाला आहे. आता ‘पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार’ जाहीर झाल्याने त्यांच्या संगीत कारकिर्दीतील आणखी एक मानाचा टप्पा अधोरेखित झाला आहे.