प्रेटोरियस, बॉश्च यांची दमदार शतके
वृत्तसंस्था / बुलावायो
झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आलेल्या द. आफ्रिका संघाने येथे शनिवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत दमदार फलंदाजी केली. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 9 बाद 418 धावा जमविल्या. या संघातील प्रेटोरियस आणि बॉश्च यांनी दमदार शतके झळकविली.
या कसोटीत द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांची सुरुवातीला स्थिती 4-55 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर ब्रेव्हीस आणि प्रेटोरियस यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी 95 धावांची भर घातली. ब्रेव्हीसने 41 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा जमविल्या. व्हेरेनीने केवळ 10 धावा केल्या. द. आफ्रिकेचे 6 गडी 181 धावांत तंबूत परतले होते.
शतकी भागिदारी
प्रेटोरियस आणि बॉश्च यांनी दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला सुस्थितीत नेताना सातव्या गड्यासाठी 108 धावांची शतकी भागिदारी केली. प्रेटोरियसने 160 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 153 धावा झळकविल्या. मात्र बॉश्च पहिल्या दिवसाअखेर 100 धावांवर खेळत आहे. त्याने 124 चेंडूत 10 चौकारांसह शतक पूर्ण केले. कर्णधार केशव महाराजने 2 षटकार आणि 1 चौकारासह 21, युसुफने 5 चौकारांसह 27 धावा केल्या. झिम्बाब्वेतर्फे टी. चिवांगाने 83 धावांत 4 तर मुझारबनीने 59 धावांत 2 तसेच वेलिंग्टन मासाकेझा आणि व्हिन्सेंट मासाकेझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका प. डाव 90 षटकात 9 बाद 418 (प्रेटोरियस 153, बॉश्च खेळत आहे 100, ब्रेव्हीस 51, केशव महाराज 21, युसुफ 27, चिवांगा 4-83, मुझारबनी 2-59, डब्ल्यु मासाकेझा व व्ही. मासाकेझा प्रत्येकी 1 बळी)