रिक्लेटोन, व्हेरेनी यांची दमदार शतके
वृत्तसंस्था / क्वेबेरा (द. आफ्रिका)
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत यजमान द. आफ्रिकेच्या 358 या धावसंख्येला चोख प्रत्युत्तर देताना लंकेने पहिल्या डावात शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 55 षटकात 2 बाद 192 धावा जमविल्या होत्या. द. आफ्रिकेतर्फे रिक्लेटोन आणि व्हेरेनी यांनी शानदार शतके झळकविली.
या कसोटीत द. आफ्रिकेचा पहिला डाव 103.4 षटकात 358 धावांवर आटोपला. रिक्लेटोनने 250 चेंडूत 11 चौकारांसह 101 तर व्हेरेनीने 133 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 105 धावा झळकविल्या. कर्णधार बहुमाने 109 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 78 धावांचे योगदान दिले. रबाडाने 40 चेंडूत 5 चौकारांसह 23 धावा जमविल्या. सलामीच्या मारक्रेमने 35 चेंडूत 4 चौकारांसह 20 धावा केल्या. या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर द. आफ्रिकेने 7 बाद 269 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ झाला. व्हेरेनीने 132 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह शतक नोंदविले. व्हेरेनीने रबाडा समवेत नवव्या गड्यासाठी 56 धावांची भागिदारी केली. लंकेतर्फे कुमाराने 79 धावांत 4 तर असिता फर्नांडोने 102 धावांत 3 तसेच विश्वा फर्नांडोने 65 धावांत 2 गडी बाद केले. जयसुर्याने 84 धावांत 1 बळी मिळविला. उपाहारानंतर काही वेळातच द. आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आला.
लंकेने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरुवात केली. निशांका आणि करुणारत्ने यांनी पहिल्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी केली. रबाडाने करुणारत्नेला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 20 धावा जमविल्या. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी लंकेने 33 षटकात 1 बाद 103 धावा जमविल्या होत्या. चहापानानंतर शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि निशांकाने आपले अर्धशतक 107 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. निशांका आणि चंडीमल यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 152 चेंडूत पूर्ण केली. दरम्यान चंडीमल 44 धावांवर बाद झाला. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी लंकेने 55 षटकात 2 बाद 192 धावा जमविल्या होत्या. निशांका 11 चौकार आणि 1 षटकारासह 88 तर मॅथ्युज 24 धावांवर खेळत होते. लंकेचा संघ अद्याप 166 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 103.4 षटकात सर्वबाद 358 (रिक्लेटोन 101, व्हेरेनी नाबाद 105, बहुमा 78, रबाडा 23, कुमारा 4-79, असिता फर्नांडो 3-102, विश्वा फर्नांडो 2-65, जयसुर्या 1-84), लंका 55 षटकात 2 बाद 192 (निशांका खेळत आहे 88, करुणारत्ने 20, चंडीमल 44, मॅथ्युज खेळत आहे 24) धावफलक अपूर्ण...