शहरात विजेचा खेळखंडोबा
मध्यवर्ती बाजारपेठेत दिवसभर लाईट गुल : वीज केंद्रात बिघाड
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
वीज केंद्रात बिघाड झाल्याने बुधवारी शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. सकाळपासून सायंकाळपर्यंत कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा नसल्याने व्यापाऱ्यांचे हाल झाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी असतानाही विजेअभावी जनरेटरवर व्यवसाय सुरू ठेवावे लागले.
हेस्कॉमकडून बुधवारी शहराला वीजपुरवठा करणाऱ्या आरएम-2 वीज केंद्रात दुरुस्ती करण्यात आली. या वीज केंद्रातून शहरात वीजपुरवठा होणाऱ्या भागामध्ये इतर केंद्रातून तात्पुरता वीजपुरवठा देण्यात येत होता. परंतु याच दरम्यान किल्ला येथे वीज केंद्राच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात लाईट गुल झाली. बुधवारी सकाळपासून बाजारात गर्दी असतानाही अनेक दुकानांमध्ये अंधार होता.
दुरुस्तीसाठी विलंब होणार असल्याने सायंकाळी 7 पर्यंत वीजपुरवठा उपलब्ध नव्हता. याचा परिणाम व्यवसाय, उद्योगांना बसला. मंगळवारी साप्ताहिक सुटीनंतर बुधवारी व्यवसाय सुरू झाले. परंतु विजेअभावी अनेक व्यवसाय बंद ठेवावे लागले. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती.
