पाडलोसमध्ये अज्ञाताकडून वीजपुरवठा खंडित
अकरा तास ग्रामस्थ विजेविना : अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार
न्हावेली / वार्ताहर
पाडलोस कृषी विद्यापीठजवळ मंगळवारी मध्यरात्री अज्ञाताने एबी स्विच बंद केला. त्यामुळे पाडलोस गावासह न्हावेली- रेवटेवाडी, आरोस, दांडेली भागातील वीजपुरवठा तब्बल 11 तास खंडित झाला होता. सदर घटनेबाबत बांदा पोलिसात तक्रार दिल्याची माहिती लाईनमन भिसे यांनी दिली.मंगळवारी मध्यरात्री 12.30 वा.च्या सुमारास पाडलोस कृषी विद्यापीठ जवळील एबीस्विच अज्ञाताने बंद केला. ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना फोन करत वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती सकाळी दिली. त्यानंतर संपूर्ण भागाची पडताळणी करण्यात आली मात्र वीज फॉल्टीचे कारण मिळेना. लाईनमन भिसे यांनी एबी स्विच जवळ जाऊन पाहिले असता एबी स्विच बंद स्थितीत आढळला. हा एक प्रकारचा गुन्हा असल्यामुळे याबाबत बांदा पोलिसात तक्रार दिल्याचे भिसे यांनी सांगितले.
घटनास्थळी पंचनामा करताना पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, पोलीस पाटील रश्मी माधव, लाईनमन श्री. भिसे, पाडलोस शिवसेना शाखाप्रमुख गौरेश पटेकर आदी उपस्थित होते.
संबंधितावर कठोर कारवाई करा
पाडलोस, दांडेली, आरोस व न्हावेली-रेवटेवाडी गावांना 11 तास विजेविना ठेवणाऱ्या अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागला. कायदा हातात घेणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी पाडलोस शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख गौरेश पटेकर यांनी केली आहे.