For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसकडून नागपुरात आज शक्तिप्रदर्शन

06:38 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसकडून नागपुरात आज शक्तिप्रदर्शन
Advertisement

पक्षाच्या स्थापनादिनी जाहीर सभा : गांधी कुटुंबीय करणार संबेधित

Advertisement

वृत्तसंस्था/ नागपूर

देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस स्वत:च्या 139 व्या स्थापनादिनी म्हणजेच गुरुवारी नागपूर येथे शक्तिप्रदर्शन करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पक्षाच्या या कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांच्यासोबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सर्व काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरातील दिघोरी नाक्यानजीक सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून यात सुमारे दोन लाख कार्यकर्ते सामील होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूरमध्येच भाजपची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने  काँग्रेसचा येथे विशाल जाहीर सभा आयोजित करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजप सरकार आणि संघाला आव्हान देत देशभरात राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न यातून काँग्रेस करणार असल्याचे मानले जात आहे.

आम्ही संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपला चोख प्रत्युत्तर देणार आहोत. सत्तारुढ भाजप सरकार बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या समेत मुख्य समस्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरले आहे. या सभेद्वारे आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारला कठोर संदेश देऊ इच्छितो. पक्षाने  यापूर्वीच ‘है तयार हम’ हा नारा दिला आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सभास्थळी तयारींचा आढावा घेतल्यावर केले आहे.

काँग्रेसच्या नाऱ्यांसोबत जनता मोठ्या प्रमाणात जोडली जाणार आहे. या सभेला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शंखनाद मानला जाऊ शकतो, असे काँग्रेस नेते नितिन राउत यांनी म्हटले आहे. भाजप एकीकडे रोजगारमुक्त भारताच्या दिशेने काम करत आहे. तर काँग्रेसने युवांना रोजगार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प घेतला आहे. काँग्रेस लोकशाहीवरील लोकांचा विश्वास टिकविण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा या पहिल्यांदाच नागपूरमध्ये एकाच व्यासपीठावर दिसून येणार आहेत. सभेत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यासारखे प्रमुख नेते आणि बहुतांश खासदार आणि 600 पैकी जवळपास 300 आमदार सामील होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील या सभेत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांना पाहण्यासाठी अभूतपूर्व गर्दी होऊ शकते असा दावा पटोले यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.