महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हायरसपेक्षा धोकादायक सत्तावाटप?

06:30 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप या दोन्ही पक्षात अंतर्गत गटबाजी वाढली आहे. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदावर निवड करताना सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते की नाही? याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सत्तासूत्र ठरले होते, असे सांगितले आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तावाटप ठरले नाही, असे सांगितले आहे. डी. के. शिवकुमार कर्नाटकात नसताना त्यांच्या राजकीय विरोधकांचे बळ वाढले आहे. 140 आमदारांचे संख्याबळ असूनही काँग्रेसमधील सत्तासंघर्ष काही कमी होईना.

Advertisement

कोरोनानंतर आता कर्नाटकात एचएमपीव्हीचेही दोन रुग्ण आढळून आले आहेत. बेंगळूर येथील दोन लहान मुलांना या व्हायरसची बाधा झाली आहे. आरोग्य खात्याला सतर्कतेची सूचना दिली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनीही आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एचएमपीव्हीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना करतानाच हा व्हायरस घातक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले आहे. तरीही कोरोनाच्या काळात जशी खबरदारी घेतली होती, तशीच खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Advertisement

एचएमपीव्हीची चर्चा सुरू झाली त्यावेळी साहजिकच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही भीती लक्षात घेऊन आरोग्य खात्याने नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याविषयी मार्गसूची जारी केली आहे. केवळ कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळू लागले आहेत. ह्यूमन मेटा न्युमो व्हायरसची लागण झाल्यास श्वसनाची समस्या उद्भवते. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना किंवा लहान मुले व वृद्धांना याची लागण होते, असे सांगतानाच नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

कर्नाटकात चिनी व्हायरसची धास्ती सुरू असतानाच कोरोनाच्या काळात झाले त्याप्रमाणे लॉकडाऊन किंवा मास्कची सक्ती होणार नाही. कारण मुळात हा व्हायरस अपायकारक नाही. केवळ त्याचा फैलाव होऊ नये यासाठी व्यापक खबरदारी घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एचएमपीव्हीची लागण दरवर्षीच होते. त्यामुळे शाळकरी मुलांसाठी मार्गसूची, विमानतळावर तपासणी आदी राहणार नाही, असेही राज्य सरकारने जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका केली आहे. एचएमपीव्हीचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना राबविली नाही, असा आरोप केला आहे. तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या मते मुळात हा व्हायरसच घातक नसल्यामुळे नागरिकांच्या मनातील धास्ती कमी झाली असली तरी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी कोरोनाच्या काळात घेतली त्याचपद्धतीने खबरदारी घेण्याची गरज आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत परदेशात गेले होते. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काही ठरावीक मंत्री, आमदारांसाठी जेवणावळीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या गुरुवारी रात्री जेवणासाठी हे सर्व नेते एकत्र आले होते. त्याच दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक होती. बैठकीनंतर हे नेते रात्रीच्या जेवणासाठी एकत्र आले. सध्या कर्नाटकातील राजकीय वर्तुळात या जेवणावळीमुळे एकच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नेतृत्व आणखी घट्ट करण्यासाठी काँग्रेसमधील अहिंद नेते सक्रिय झाले आहेत. या घडामोडींमुळे डी. के. शिवकुमार परदेशातून आल्यानंतर थेट नवी दिल्लीत पोहोचले. हायकमांडची भेट घेऊन त्यांनी या घडामोडींची माहिती दिली आहे. या पाठोपाठ गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही जेवणावळीचे आयोजन केले होते. हायकमांडच्या सूचनेनुसार तूर्त ते रद्द करण्यात आले आहे. यामागे डी. के. शिवकुमार यांनी हायकमांडवर वापरलेला दबाव कारणीभूत आहे.

डी. के. शिवकुमार यांच्या तक्रारीनंतर बुधवारी खासगी हॉटेलमध्ये होऊ घातलेली जेवणावळ रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसमधील जेवणावळीआड सुरू असलेल्या गटबाजीवर काँग्रेसचे नेते संतापले आहेत. हायकमांडच्या सूचनेनुसार कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी डिनर मिटींग रद्द करण्यास सांगितले आहे. ती तूर्त रद्द झाली तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. डिनर मिटींग करायची असेल तर पक्षाच्या व्यासपीठावरच का करू नये? असा प्रश्न हायकमांडने उपस्थित केला आहे.

कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असतानाच 2028 ला आपण मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असणार आहे. त्यावेळी काय होते ते पाहू, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. निजदचे आमदार शरणगौडा कंदकूर यांनीही सतीश जारकीहोळी यांच्यासारखे प्रभावी व सज्जन नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जेणेकरून डी. के. शिवकुमार यांना डिवचण्याचे प्रयत्न काँग्रेसमध्ये सुरू झाले आहेत. जेवणासाठी केवळ ठरावीक नेत्यांनाच का बोलावण्यात आले? या प्रश्नाला तुम्ही सतीश जारकीहोळी यांनाच विचारा, असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तो उडवून लावला आहे. डी. के. शिवकुमार यांनीही जेवणावळीत सहभागी झाले तर गैर काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला असला तरी जेवणावळीच्याआड सुरू असलेल्या पॉवर पॉलिटिक्सला विरोध करत हायकमांडकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येते.

सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप या दोन्ही पक्षात अंतर्गत गटबाजी वाढली आहे. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदावर निवड करताना सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते की नाही? याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सत्तासूत्र ठरले होते, असे सांगितले आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तावाटप ठरले नाही, असे सांगितले आहे. डी. के. शिवकुमार कर्नाटकात नसताना त्यांच्या राजकीय विरोधकांचे बळ वाढले आहे. 140 आमदारांचे संख्याबळ असूनही काँग्रेसमधील सत्तासंघर्ष काही कमी होईना. मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण पुण्यकाळ सुरू होतो.

या पुण्यकाळासाठी राजकीय नेत्यांना प्रतीक्षा आहे. भाजपमधील परिस्थितीही सारखीच आहे. बी. वाय. विजयेंद्र विरोधकांनी वक्फ बोर्डविरोधी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. विजयेंद्र समर्थकांनी हायकमांडकडे यासंबंधी तक्रार केली आहे. विरोधकांनीही नवी दिल्लीत आपली बाजू मांडली आहे. या दोन्ही पक्षातील सत्तासंघर्ष थांबता थांबेना. मकरसंक्रांतीनंतर या संघर्षाची धार वाढणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article