मेंडील येथे नऊ महिन्यांपासून वीज गायब
ग्रामस्थांचा हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा : डिसेंबर महिन्यातही हेस्कॉमकडून केवळ आश्वासन मात्र कार्यवाही नाही
खानापूर : तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील दुर्गम अशा मेंडील येथे गेल्या नऊ महिन्यांपासून वीजपुरवठा ठप्प आहे. 22 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी हेस्कॉमचे अधिकारी मोहिते यांनी आठ दिवसांत कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना झाला तरी हेस्कॉमचे अधिकारी मेंडील येथे फिरकलेच नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवार दि. 4 रोजी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत 8 फेब्रुवारीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. येत्या दि. 8 पर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.गेल्या आठ महिन्यांपासून मेंडील गावचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनदेखील दखल घेण्यात आलेली नाही.
तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील अती दुर्गम आणि तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या मेंडील येथे वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. 75 वर्षांपासून हे गाव अंधारातच चाचपडत आहे. सदर गाव दुर्गम भागात असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. अशातच वीजपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने रेशनवरील रॉकेल पुरवठाही बंद केल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तेंड देत जीवन जगावे लागत आहे. याबाबत खानापूर हेस्कॉम अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करण्यात आल्या. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना गेल्या नऊ महिन्यांपासून अंधारातच जीवन जगावे लागत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात मेंडिल ग्रामस्थांनी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. याकडेही हेस्कॉमने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी पुन्हा मंगळवारी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
शनिवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
यावेळी हेस्कॉमचे अभियंते मोहिते यांनी कोणत्याही परिस्थितीत 8 फेब्रुवारीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिरोली ग्राम पंचायत सदस्य दीपक गवाळकर, विजय मादार, नामदेव पाटील, पांडुरंग पाटील, संतोष गुरव, शाबा मळीक, जयराम पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सौर ऊर्जेच्या यंत्रात बिघाड
गेल्या आठ वर्षांपूर्वी शासनाकडून मेंडील येथे सौर ऊर्जेवर वीजपुरवठा करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून सौर यंत्रणेत बिघाड झाल्याने वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. तर नऊ महिन्यांपासून सौर ऊर्जेच्या यंत्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे बंद आहे.