आचरा येथे पिंपळ कोसळल्याने विद्युत वाहिन्या, दुचाकीचे नुकसान
आचरा प्रतिनिधी (फोटो परेश सावंत)
आचरा देऊळवाडी येथे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेला महाकाय पिंपळवृक्ष अर्धवट मोडून रात्रीच्या सुमारास रस्त्यावर कोसळला. यात मोठया प्रमाणात विद्युत वाहिन्या तुटून जमीनदोस्त झाल्या. रस्त्यालगत उभी करून ठेवण्यात आलेली दुचाकी कोसळलेल्या वृक्षाखाली सापडल्याने नुकसान झाले. आचरा रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच दिवसा भाविक, स्थानिक ग्रामस्थ यांची रहदारी असते . वृक्ष रात्री कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आचरा देऊळवाडीतील रमेश पुजारे यांच्या घराशेजारी रस्त्यालगत असलेला वृक्ष कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाजाने नजीक राहणारे ग्रामस्थ घाबरून बाहेर आले. वृक्ष कोसळला असल्याने विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर व बाजूच्या ओहळात पडल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी व परेश सावंत यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सबस्टेशनला घटनेची माहिती देत विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सांगितला.रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर वृक्ष हटवण्यासाठी सरपंच जेरोन फर्नाडिस यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. लाकूडतोड व्यावसायिक विक्रांत आचरेकर यांच्या सहकार्याने स्थानिक ग्रामस्थ व पोलीस हवालदार असलेले मनोज पुजारे, सदाशिव पुजारे, रमेश पुजारे, रामदास घाडी, रुपेश पुजारे, गणपत पुजारे, उदय पुजारे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, परेश सावंत, दादा बापर्डेकर, प्रशांत सावंत आदींसह अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने फांद्या कापून पहाटे चार वाजेपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला. विद्युत मंडळ कर्मचारी पिंटू साळकर, मंगेश परब, गणेश गोवेकर व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेत रात्रीपासून खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत केला.