बापट गल्ली येथे वीज वाहिन्यांनी घेतला पेट
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
बेळगाव : विद्युत खांबावरील वीज वाहिन्यांना आग लागण्याची घटना रविवारी सकाळी बापट गल्ली येथे घडली. खांबावरील वीज वाहिन्यांनी अचानक पेट घेतल्याने सर्व वीज वाहिन्या जळून खाक झाल्या. सुदैवाने आसपासच्या दुकानांपर्यंत ही आग पोहोचली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बेळगावचे इलेक्ट्रॉनिक मार्केट म्हणून ओळख असलेल्या बापट गल्ली येथील विद्युत खांबावर वीज वाहिन्यांसह इतर केबल ओढल्या आहेत. वाहिन्यांच्या वाढत्या जंजाळामुळे दुरुस्तीवेळी अडचणी येत होत्या. केबल चालकांना अनेकवेळा कळवूनही त्यांच्याकडून योग्य दुरुस्ती होत नव्हती. सध्या वाढत्या उन्हामुळे वीज वाहिन्या निकामी होऊन पेट घेत असल्याचे दिसून आले. रविवारी अशाचप्रकारे एका विद्युत खांबावरील वीज वाहिन्यांनी पेट घेतला. आजूबाजूला अनेक इलेक्ट्रॉनिक दुकाने असल्याने धोका निर्माण झाला होता. सर्व वीज वाहिन्या जळून खाक झाल्यानंतर आग आटोक्यात आली. अनधिकृतरित्या विद्युत खांबावरून ओढलेल्या केबल्सवर वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे.