हलशी भागातील पोल्ट्रीधारकांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मोठा आर्थिक तोटा
हजारो कोंबड्यांचा मृत्यू, हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर/हलशी
खानापूर तालुक्यातील हलशी परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेला विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. या समस्येमुळे स्थानिक पोल्ट्री धारकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्याने या भागातील पोल्ट्री फॉर्ममध्ये हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, पोल्ट्रीधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेनंतर हलशी परिसरातील 25 ते 30 पोल्ट्री धारकांनी हेस्कॉमच्या हलशी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून 24 तास नियमित विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच पोल्ट्रीधारकांनी या संदर्भात नंदगड भागाचे नेते व माजी आमदार अरविंद पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. अरविंद पाटील यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून हलशी भागात विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पोल्ट्रीधारकांच्या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
निवेदनात पोल्ट्रीधारकांनी नमूद केले आहे की, तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच नंदगड व हत्तरवाड येथे 24 तास विद्युतपुरवठा दिला जातो. मात्र हलशी भागातील पोल्ट्री फॉर्मना एल. टी. शेती लाईनवरून करंट दिला जात असल्यामुळे पुरवठा अस्थिर राहतो. सतत वीज जाण्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रत्येक पोल्ट्रीधारकाच्या किमान 500 ते 1000 कोंबड्या मरण पावत आहेत. त्यामुळे प्रत्येक पोल्ट्रीधारकाचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. आम्हाला 24 तास नियमित वीज द्यावी, अन्यथा निदान सायंकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सिंगलफेज करंट उपलब्ध करून द्यावा. पोल्ट्रीधारकांनी हेस्कॉमवर दुटप्पी भूमिका घेण्याचा आरोप केला आहे. काही गावांमध्ये सलग वीजपुरवठा चालू ठेवून काही भागांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि पोल्ट्रीधारकांनी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हलशी भागातील परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, भविष्यात पोल्ट्रीधारकांचे होणारे नुकसान आणि मृत्यू झालेल्या कोंबड्यांची जबाबदारी हेस्कॉम विभागावरच येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हलशी भागात 24 तास अखंड विद्युतपुरवठा सुरू ठेवावा
किमान सायंकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत तरी सिंगलफेज करंट उपलब्ध करून द्यावा. पोल्ट्री फॉर्मसाठी स्वतंत्र वीजलाईन (फेज) देण्याचा विचार करावा.झालेल्या आर्थिक नुकसानीचा हेस्कॉमने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी. हलशी परिसरातील नागरिकांनीही पोल्ट्रीधारकांच्या या मागणीस पाठिंबा देत हेस्कॉम अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.