फोर्टरोडवर खड्ड्यांचे साम्राज्य : प्रवाशात संताप
वाहनधारकांना करावी लागते कसरत, दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : फोर्ट रोडच्या एका बाजुच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावलोपावली खड्डे पडले असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेने लक्ष घालून रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.
जिजामाता चौकाकडून देशपांडे पेट्रोल पंपकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे अवघड बनले होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार आसिफ सेठ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. त्यानंतर आमदार निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण देशपांडे पेट्रोल पंपकडून जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ‘खड्ड्यावर रस्ते की खड्ड्यात रस्ता’ हे समजणे कठीण झाले आहे.
सदर रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातून ये-जा करण्याची वेळ आली आहे. पाऊस पडल्यास खड्ड्यामध्ये पाणी तुंबत आहे. ऊन पडल्यास परिसरातील व्यापारी, रहिवाशांना तसेच वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे महापालिका तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे.