बिडी-गोलीहळळी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
राज्यमार्गाची दुरवस्था, वाहनधारक-जनतेत नाराजी
वार्ताहर/नंदगड
बिडीपासून गोलीहळी गावापर्यंत रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक व जनतेची गैरसोय होत आहे. खानापूर तालुक्यातील पूर्व भागातील बिडी हे महत्त्वाचे गाव आहे. बँक, शाळा, महाविद्यालय, दवाखाना, शासकीय कार्यालय, बाजार व अन्य विविध कामांसाठी परिसरातील अनेक गावांचा संपर्क बिडी गावाशी येतो. शिवाय खानापूर-तालगुप्पा राज्यमार्ग बिडी गावाजवळून जातो. याच मार्गावर बिडी गावच्या बसथांब्यापासून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. नाल्यावरील पुलावर तसेच गोलीहळी गावच्या वेशीजवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिवाय दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी गैरसोयीचा बनला आहे. खानापूर तालुक्यातील निम्म्या लोकांचा संपर्क येणाऱ्या या रस्त्यावर खड्डे पडल्याने जनतेतून प्रशासनाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.