पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर सावंतवाडी एसटी डेपोतील खड्डे बुजवले; प्रवाशांना दिलासा
सावंतवाडी : येथील एसटी बस स्थानक परिसरातील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि नागरिकांना होणारा त्रास अखेर दूर झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत डेपो परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. बस स्थानकात ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यांमधील दूषित पाणी आणि चिखल प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
या समस्येकडे संवाद तरुण भारतने लक्ष वेधले होते. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी या समस्येची तातडीने दखल घेत संबंधित विभागाला सूचना केल्या. सावंतवाडी एसटी डेपो परिसरातील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले.
पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर एसटी प्रशासनाने तातडीने काम हाती घेत मंगळवारी डेपो परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले. खड्डे पुन्हा पडू नयेत आणि काम टिकाऊ राहावे यासाठी सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे.
खड्डे बुजवल्यामुळे बस स्थानक परिसरातील वाहतूक आता सुरळीत झाली असून प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या तत्परतेने आणि एसटी प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे सावंतवाडीतील प्रवासी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.