गणाचारी कॉर्नरवरील खड्ड्यामुळे वाहनधारकांना धोका
बेळगाव : शहरातील गणाचारी गल्लीच्या कॉर्नरवर डेनेज कामासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठा खड्डा खोदण्यात आल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषत: वाहनधारकांना याचा सर्वाधिक त्रास होत असून, वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. एखादे चारचाकी किंवा रिक्षा या मार्गावरून जात असताना खड्ड्यामुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रसंगी वाहतूक केंडीही निर्माण होत आहे. यामुळे लवकरात लवकर काम संपवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर खोदलेला मोठा खड्डा तसाच उघडा पडून आहे. खड्ड्याभोवती बॅरिकेड्स किंवा झाडेझुडपे लावण्यात येत आहेत. काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील रहिवासी, दुकानदार तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. अऊंद रस्ता आणि खोदाईमुळे दुचाकीस्वारांना तर कसरत करत मार्ग काढावा लागत असून याचा सर्वाधिक फटका चारचाकी व रिक्षा चालकांना बसत ओह. खड्ड्यामुळे अपघाताचीही शक्मयता निर्माण झाली असून वेळीच काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
रस्ता पूर्ववत करण्याची मागणी
रात्रीच्या वेळी योग्य सूचना फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना अधिक धोका निर्माण होत आहे. काम पूर्ण न झाल्यास समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विभागाने कामाचा वेग वाढवून डेनेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी केली आहे.