पोतदार रॉयल्स सीसीआय, रोहन ट्रेडर्स विजयी
युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून पोतदार रॉयल्स सीसीआय संघाने भाटे वॉरियर्स संघाचा तर रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने सुपर एकसप्रेस युनियन जिमखाना संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. आदर्श हिरेमठ (पोतदार रॉयल्स) राहुल नाईक (रोहन ट्रेडर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या थरारक लढतीत पोतदार रॉयल्स संघाने भाटे वॉरिअर संघाचा केवळ 3 धावांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 176 धावा केल्या. त्यात आदर्श हिरेमठने 7 षटकारांसह 79, अंगदराज हितलमनीने 2 षटकार 2 चौकारांसह 40 तर अमित यादवने 1 षटकार 3 चौकारांसह 32 धावांचे योगदान दिले. भाटेतर्फे हार्दिक ओझा व फरान पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटे वॉरियर्स संघाने 20 षटकात 8 गडी बाद 173 धावांपर्यंत मजल मारली. त्यात राहुल वेर्णेकरने 3 षटकार 4 चौकारांसह 52, माजी मकानदारने 31 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 61, अमेय भातकांडेने 1 षटकार 4 चौकारासह 29 धावा केल्या. पोतदारतर्फे स्वयम आपण्णावर, आदर्श हिरेमठ व अंगदराज हितलमनी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर या सामन्यात भाटे वॉरियर्स संघाचे चार फलंदाज धावबाद झाले.