बटाट्याच्या नावाखाली दारूची बेकायदा वाहतूक; 18.72 लाखांच्या 300 पेट्या जप्त
काणकोण: गोव्यातून कर्नाटकाच्या दिशने जाणाऱ्या केएएडी 4880 क्रमांकाच्या वाहनातील भारतीय बनावटीच्या परदेशी दारूच्या जवळजवळ 300 पेट्या इतकी बेकायदेशीर दारू पोळे चेकनाक्यावरील अबकारी कर्मचाऱ्यांनी पकडली असून बाजारभावानुसार त्याची किंमत 18 लाख 72 हजार रु इतकी असल्याची असल्याची माहिती काणकोणचे अबकारी निरीक्षक रोहित देसाई यांनी दिली
ही कारवाई 6 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 च्या दरम्यान करण्यात आली. बेकायदा दारू वाहतूक करणारे वाहन सध्या अबकारी खात्याच्या ताब्यात असून त्या वाहनाची किंमत धरून एकूण 25 लाख 22 हजार रु इतक्या किमतीची मालमता खात्याच्या ताब्यात आहे. या कारवाईनंतर गोव्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या दारू कर्नाटक आणि अन्य राज्यांत पाठविणे सुरु असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वी बऱ्याच वेळा पोळे चेकनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होणाऱ्या अशा प्रकारच्या गैरव्यवहारातील व्यक्तींना मुद्देमालासहित माजाळी चेकनाक्यावर पकडले जायचे. मात्र पोळे चेकनाक्यावरील या कारवाईमुळे गोव्याच्या अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला आहे
या वाहनात बटाटे भरलेले होते. एरव्ही कांदा बटाटे यासारखी भाजी कर्नाटक आणि अन्य राज्यांतून गोव्यात येत असताना गोव्यातून बटाटे घेऊन जाणारे सदर वाहन नाक्यावरील अबकारी कर्मचाऱ्यांनी संशयावरून अडविले. त्यात अबकारी निरीक्षक रोहित देसाई उपनिरीक्षक प्रदीप खोलकर अनिल मुळगावकर राज परब दिलखुश वेळीप रामचंद्र आचार्य सूरज सावंत या अबकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोळे चेकनाक्यावर संशयावरून वाहन अडविण्यात आल्यानंतर सदर वाहनाचा चालक आणि अन्य कर्मचारी वाहन त्याच ठिकाणी टाकून पसार झाले अशी माहिती अबकारी निरीक्षक देसाई यांनी दिली
गोव्याच्या सीमेवरून कर्नाटक आणि अन्य राज्यांत जाणाऱ्या सर्व वाहनांची या ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे. 2 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका कांद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून बेकायदा नेली जाणारी दारू पकडण्यात आली होती. मात्र आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. काणकोणचे अबकारी निरीक्षक देसाई यांनी गुन्हा नोंद करतानाच सर्व माल ताब्यात घेतला आहे आणि पुढील चौकशी सुरु केली आहे