For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बटाटा दरात 300 रुपयांनी वाढ, कांदा दर स्थिर

11:21 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बटाटा दरात 300 रुपयांनी वाढ  कांदा दर स्थिर
Advertisement

रताळी, गूळ, बेळगाव बटाटा भाव क्विंटलला स्थिर : भाजीपाल्याचे दरही स्थिर : एपीएमसी बाजारात 50 पिशव्या रताळी आवक

Advertisement

अगसगे : बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात बटाटा भाव क्विंटलला 300 रुपयांनी वधारला तर कांदा दरात स्थिरता आहे. रताळी, गूळ, बेळगाव बटाटा भाव क्विंटलला स्थिर आहे. इंदोरमध्ये बटाटा आवक जवळपास संपत आली आहे. यामुळे गेल्या 15 दिवसापासून दरात हळूहळू वाढ होत आहे. बटाटा आवकेत घट निर्माण होत असल्यामुळे बेळगाव जवारी बटाटा खरेदीकडे खरेदीदारांचा कल वाढत चालला आहे. भाजीमार्केटमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. गोव्यामध्ये गवार अधिक प्रमाणात उत्पादन झाले आहे. यामुळे गोव्याहून गवार विक्रीसाठी भाजीमार्केटमध्ये येत आहे. तर चुकून काही प्रमाणात मिरची मुंबईला लोडींग होऊन विक्रीसाठी जात आहे.

बटाटा आवकेत घट, दरात वाढ

Advertisement

बुधवार दि. 3 रोजी इंदोर बटाटा ट्रक केवळ दोनच आल्याने खरेदीदारांतून इंदोर बटाटा खरेदीसाठी चढाओढ सुरू झाल्याने आग्रा बटाटा आणि बेळगाव जवारी बटाटादेखील भाव वाढला. इंदोर बटाटा भाव 2600-2800 रु., आग्रा बटाटा 2400-2500 रु., बेळगाव जवारी बटाटा 1000-3000 रुपये क्विंटल भाव झाला. शनिवार दि. 6 रोजी झालेल्या बाजारात इंदोर बटाटा भाव 2600-2800 रु., आग्रा बटाटा 2200-2500 रु., बेळगाव जवारी बटाटा 2500-2600 रुपये झाला. गुळाचा भाव 1400-1600 रुपये झाला, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

पुढील आठवड्यात शितगृहातील इंदोर बटाटा येणार

सध्या इंदोरमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांनी शेतवडीमध्ये साठवून ठेवलेला बटाटा जवळपास संपला आहे. येत्या दि. 10 नंतर शितगृहामधील बटाटा काढणीस प्रारंभ होणार आहे. डिसेंबर 2023 पासून इंदोर बटाटा काढणीला प्रारंभ होतो. यानंतर जानेवारी व फेब्रुवारीला तेजी-मंदीचे खरेदीदार व काही मोठे शेतकरी इंदोर बटाटा शितगृहामध्ये साठवून ठेवतात आणि डिसेंबर 2024 पर्यंत वर्षभर देशातील विविध बाजारात विक्रीसाठी पाठवतात. ज्या राज्यामध्ये बटाटा भाव वाढला आहे. त्याठिकाणी बटाटा पाठवतात. वर्षभर पुरेल इतका बटाटा साठा इंदोरच्या शितगृहामध्ये साठवून ठेवला आहे. त्याचप्रमाणे आग्रा बटाटा देखील शितगृहामध्ये साठवून ठेवण्यात आला आहे. शितगृहातील इंदोर बटाटा बाजारात आल्यास त्याचा भाव किती असणार आहे. याकडे खरेदीदारांचे लक्ष लागून आहे.

कांदा भाव स्थिर

सध्या बेळगावसह विविध राज्यांमध्ये महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी जात आहे. बाजारात एक नंबरचा कांदा विक्रीसाठी येत आहे. गेल्या दोन महिन्यापासून कांदा दरात स्थिरता आहे. सध्या गोवा, कोकणपट्टा, म्हापसा, पणजी, कारवार, दांडेली, खानापूर, राणेबेन्नूर, बैलहोंगल, गोकाक, रायबाग, रामदुर्ग, बेळगावमधील खरेदीदार महाराष्ट्र कांदा खरेदी करीत आहेत. भाव 500-1900 रुपये होत आहे. मात्र हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कारण पुण्याहून बेळगावला आणण्यासाठी येणारा वाहनाचा खर्च तीन महिने उत्पादनासाठी लागलेला खर्च पाहता हा दर परवडत नाही. यामुळे महाराष्ट्र शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

जवारी बटाटा आवकेत वाढ

सध्या बेळगाव तालुक्यातील पश्चिम भाग आणि उत्तर भागामध्ये रब्बी हंगामातील जवारी बटाटा काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होऊन महिना उलटला आहे. गेल्या एक महिन्यापासून तुरळक आवक बाजारात सुरूच होती. बुधवारी इंदोर आणि आग्रा बटाट्याची टंचाई निर्माण झाल्याने सहजच खरेदीदार जवारी बटाट्याकडे वळल्याने जवारी बटाटा दि. 3 रोजी भाव 500-3000 रुपये झाला होता. यामुळे शनिवारी मार्केट यार्डमध्ये सुमारे चार हजार पिशव्या बटाटा विक्रीसाठी दाखल झाला. लाल जमिनीतील जवारी बटाट्याला अधिक मागणी आहे. यावेळी बटाटा भाव सुमारे 2500-2600 रुपये झाल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

नवीन रताळी आवकेला प्रारंभ

यापूर्वी रताळी पिकाची उत्पादन वर्षातून दोनवेळा घेण्यात येत होते. एक पावसाळ्यात आणि दुसरे रब्बी हंगामामध्ये आता तशी परिस्थिती नसून रताळी मार्केटमध्ये बारा महिने मिळतात. दुसऱ्या टप्प्यातील रताळी आवकेला प्रारंभ झाला आहे. शनिवारी सुमारे 50 पिशव्या रताळी आवक मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आली होती. स्थानिक खरेदीदार सध्या ही रताळी खरेदी करीत आहेत. यावेळी भाव 1400 ते 1800 रुपये झाल्याची माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाला भाव स्थिर

सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला भाजीमार्केटमध्ये येत आहे. परराज्यातून येणारा भाजीपाला बंद झाला आहे. तर यंदा गोव्यामध्ये गवार पिकाचे उत्पादन वाढले आहे. यामुळे गवार बेळगाव भाजीमार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. विशेषत: बेळगावहून गोव्याला भाजीपाला जातो. काही प्रमाणात चुकून मिरची मुंबईला विक्रीसाठी जात आहे. आणखी पंधरा दिवसानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.