नवजात बालकांचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी पोस्टमनकडे
कोल्हापूर :
बाळ जन्माला आल्यावर आता काही तासातच त्याचे आधार कार्ड रुग्णालयातच काढण्यात येणार आहे. येथूनच बाळाचा आधारबेस जन्म दाखला दिला जाणार आहे. ही जबाबदारी टपाल खात्याकडे देण्यात येणार असून पोस्टमन आधार कार्ड काढणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात नवजात बालकांचे आधारकार्ड काढण्याची सुरुवात आठ दिवसात होणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या असून सर्व सरकारी रुग्णालयात ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जन्मानंतर लगेचच बालकांचे आधारकार्ड काढण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मुले मोठी झाली तरी बहुतांश मुलांचे कार्ड नसते. यामुळे शासकीय कामासाठी अडथळे निर्माण होतात. शाळा प्रवेशासह अन्य कामासाठी ही अडचण येऊ नये यासाठी नवजात बालकांचे आधारकार्ड रुग्णालयातच काढण्यात येणार आहे.
नवजात बालकांचे आधारकार्ड जबाबदारी टपाल खात्याला देण्यात आली आहे. यासाठी पोस्टमनना टॅब दिले असून त्यावर आधार नोंदणी होणार आहे. आधार कार्ड काढण्यासाठी संबंधित रुग्णालयांनाही सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात प्रसूती झाल्यावर त्याची माहिती संबंधित पोस्टमनला दिली जाणार आहे. यानंतर काही वेळातच पोस्टमन रुग्णालयात येऊन बालकांचे आधारकार्ड नोंदणी करणार आहे. नवजात बालकांच्या आधारकार्डमुळे बालकांना पळवून नेण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. याबरोबरच ओळखपत्रासाठीही वापर होणार आहे.