For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आता पोस्टमन देणार पेन्शनसाठी हयातीचा दाखला; घरबसल्या मिळणार डिजिटल सेवा, १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम

11:28 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आता पोस्टमन देणार पेन्शनसाठी हयातीचा दाखला  घरबसल्या मिळणार डिजिटल सेवा  १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम
Advertisement

दीपक जाधव

Advertisement

कोल्हापूर: केंद्र आणि राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते. हे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी प्रत्येक पेन्शनधारकाला आपल्या हयातीचा दाखला डिसेंबर अखेरपर्यंत पेन्शन विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र ही प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली असून हा दाखला आता पोस्टमनच्या माध्यमातूनही मिळणार आहे. कोल्हापूर डाक विभागाकडून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वेळेत हयातीचा दाखला संबंधित विभागाकडे जमा न केल्यास त्यांचे निवृत्तीवेतन बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकांना जास्त पैसे देऊन खाजगी केंद्रावरून हा दाखला काढावा लागतो. तसेच इंटरनेट, सर्व्हर डाऊन किंवा बायोमेट्रिक पडताळणी न होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. वयोवृद्ध आणि आजारी पेन्शन धारकांसाठी हा त्रास अधिकच वाढतो.

Advertisement

या पार्श्वभूमीवर डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून घरपोच डिजिटल सेवा सुरू केली आहे. आता पेन्शनधारकाला आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. पोस्टमन घरी येऊन बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करता येणार आहे.

चेहरा ओळख पडताळणीमुळे प्रक्रिया झाली सुलभ

वाढत्या वयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हाताच्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नाहीत. त्यामुळे बायोमेट्रिक मशीनवर पडताळणी करताना अडचण येते आणि हयातीचा दाखला नाकारला जातो. हीच अडचण लक्षात घेऊन डाक विभागाने आता फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख पडताळणी) ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्यांचे ठसे उमटत नाहीत, अशा पेन्शनधारकांना केवळ चेहऱ्याद्वारे ओळख पटवून दाखला सादर करता येणार आहे.

घरबसल्या मिळणार डिजिटल सेवा
या नव्या सुविधेमुळे पेन्शनधारकांना बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच डिजिटल सेवा उपलब्ध होत असल्याने वयोवृद्ध, आजारी किंवा एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास टाळता येणार आहे. केवळ एका फोनवर पोस्टमन घरी येऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

१ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांना या सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठी डाक विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून डाक विभागामार्फत 'Nationwide Digital Life Certificate (DLC) Campaign ५.०' ही विशेष मोहीम १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत पोहोचून त्यांचे हयातीचे दाखले घरबसल्या भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांनी या डिजिटल सुविधेचा आणि विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
-वैभव वाघमारे, प्रवर अधीक्षक डाकघर कोल्हापूर

इंटरनेट, सर्व्हर डाऊन किंवा बायोमेट्रिक पडताळणी न होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात, वयोवृद्ध आणि आजारी पेन्शन धारकांसाठी हा त्रास अधिकच वाढतो. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून पेन्शन वेळेत सुरू राहण्यास मदत होणार आहे.
-अनिल लव्हेकर, निवृत्त कर्मचारी

Advertisement
Tags :

.