Sangli News : शाहूनगर परिसरात वृद्धेचे अडीच लाखांचे दागिने लुटणाऱ्या पोस्टमनला अटक
संजयनगर पोलिसांकडून अवघ्या तीन तासांत जबरी चोरीचा छडा
सांगली : सांगली शहरातील शाहूनगर परिसरात मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या एका ८४ वर्षीय वृद्ध महिलेला धमकावून तिच्या गळ्यातील २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून पळ काढणाऱ्या कंत्राटी पोस्टमनला संजयनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अटक करून जबरी चोरीचा छडा लावला आहे. या प्रकरणी प्रवीण प्रल्हाद मोरे (वय ३६, रा. अष्टविनायक नगर, गल्ली क्रमांक १०, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी इंदुबाई राजाराम सूर्यवंशी (वय ८४, रा. अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ, शाहूनगर) या मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शाहूनगर येथील महापालिकेच्या मोकळ्या मैदानात फिरत होत्या. त्यावेळी संशयित प्रवीण मोरे हा सायकलवरून तेथे आला. त्याने अचानक सूर्यवंशी यांच्याजवळ येत जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील दागिने ओढण्यास सुरुवात केली. सूर्यवंशी यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने त्यांचा गळा दाबत “ओरडू नकोस, नाहीतर जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ व मंगळसूत्र जोरात ओढून तोडले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या झटापटीत वृद्धेच्या गळ्यावर दाब बसून जखमेच्या खुणा उमटल्या.
आरोपी पळून गेल्यानंतर सूर्यवंशी यांनी आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्वरित तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी प्रवीण मोरे हा सायकलवरून घटनास्थळी येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अवघ्या तीन तासांत जबरी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश कदम, उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले तसेच विनोद साळुंखे, कपिल साळुंखे, शरद वंजारे, संतोष पुजारी, सुशांत लोंढे, नितीन पाटील, अभिजीत सावंत, दत्तात्रय पाटील, आकाश गायकवाड यांच्या पथकाने केली.