दगडफेक करणाऱ्यांची पोस्टर्स झळकणार
संभल हिंसाप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची मोठी कारवाई : प्रशासनाकडून नुकसानीची होणार वसुली
वृत्तसंस्था/संभल
उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यात 24 नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने मोठ्या कारवाईची तयारी चालविली आहे. पोलीस संभल येथे दगडफेक करणारे आणि जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेत आहेत. दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स आता चौकात झळकविली जाणार आहेत. याचबरोबर नुकसानीची वसुली त्यांच्याकडून केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास फरार समाजकंटकांच्या विरोधात इनामही घोषित केले जाईल.
सर्वेक्षणाच्या एक दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाने जामा मशिद समितीला नोटीस दिली होती. सर्वेक्षण पथक तेथे पोहोचले असता संभल आमदार इक्बाल महमूदचा पुत्र सुहेल हा मशिदीत पोहोचला, त्याने सर्वेक्षण टीमसोबत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. तर टीमने स्पष्ट नकार दिला होता. यानंतरच समाजकंटकांची गर्दी जमा झाली आणि दगडफेक सुरू झाल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या आरोपींची छायाचित्रे लवकरच प्रसारमाध्यमांकरता जारी करण्यात आली आहेत. पोलिसांनी शेकडो आरोपींची ओळख पटविली असून त्यांना अटक करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
हिंसेत 5 जणांचा मृत्यू
संभल येथे झालेल्या हिंसेच्या तीन दिवसांनी बुधवारी जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. शाळा सुरू झाल्या असून आवश्यक सामग्रीची विक्रीही सुरू झाली आहे. परंतु जिल्ह्यातील इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे. प्रशासनाने संवेदनशील क्षेत्रांमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांकडून शीघ्र कृति दल तैनात करण्यात आले आहे. हिंसेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. 30 नोव्हेंबरपर्यंत बाहेरील लोक आणि लोकप्रतिनिधींना जिल्ह्यात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी हिंसेप्रकरणी आतापर्यंत 27 जणांना अटक केली आहे. सप खासदार जिया-उर रहमान बर्क, आमदार इक्बाल महमूदचे पुत्र सोहैल इक्बाल समवेत 2,750 जणांना आरोपी करण्यात आले आहे. पोलीस ड्रोन आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पडताळून पाहत आहेत. दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.