‘कत्लन :द हंटर’चे पोस्टर जारी
मल्याळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता एंटोनी वर्गीज पुन्हा चर्चेत आहे. त्याचा आगामी अॅक्शनपट ‘कल्तन-द हंटर’चे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये एंटोनीला अत्यंत इंटेन्स आणि पूर्वी कधीच न पाहिले गेलेल्या लुकमध्ये दाखविण्यात आले आहे.
‘कत्लन-द हंटर’चे दिग्दर्शन पॉल जॉर्ज करत असून तो याच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट हस्तीदंताच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे समजते. यात एंटोनीला एक रफ-टफ, अॅक्शन हीरोच्या स्वरुपात सादर केले जाणार आहे. कहाणीत अॅक्शनसोबत ग्रे शेड्सयुक्त ड्रामाही पाहता येणार आहे. एंटोनी या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाला होता. थायलंडमध्ये चित्रिकरणादरम्यान एका अॅक्शन सीनवेळी तो हत्तीशी निगडित स्टंट सीक्वेंसदरम्यान जखमी झाला होता. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चित्रिकरण दोन आठवड्यांसाठी रोखण्यात आले होते.
या चित्रपटाला अजनीश लोकनाथ यांचे संगीत लाभणार आहे. अजनीश यांनी यापूर्वी ‘कांतारा’सारख्या सुपरहिट चित्रपटाला संगीत दिले होते. चित्रपटाची निर्मिती शरीफ मोहम्मद करत असून त्यांना ‘मार्को’ चित्रपटासाठी ओळखले जाते.