For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोस्टाची रजिस्टर सेवा होणार बंद

12:57 PM Aug 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोस्टाची रजिस्टर सेवा होणार बंद
Advertisement

1 सप्टेंबरपासून स्पीड पोस्टचा करावा लागणार वापर

Advertisement

बेळगाव : रजिस्टर पोस्ट घेऊन पोस्टमन दारात येताच अनेकांच्या मनात धस्स होत होते. कारण रजिस्टर पोस्टाने एकतर बँकांच्या कर्जाची नोटीस, अन्यथा न्यायालयातून बजावलेला समन्स, अशी भावना असायची. त्यामुळे संबंधित व्यक्तीपर्यंत ते पोस्ट पोहोचत होते. रजिस्टर पोस्टला सर्वाधिक विश्वासार्हता मानली जायची. परंतु, पोस्ट विभागाने रजिस्टर पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आता स्पीड पोस्टचा वापर केला जाणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने 2.0 ही नवीन प्रणाली स्वीकारल्यामुळे अनेक सेवांमध्ये बदल करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली रजिस्टर पोस्ट सेवा बंद केली जाणार आहे.

रजिस्टर पोस्ट म्हणजे संबंधित व्यक्तीला पत्र पोहोचेल याची शाश्वती असायची. त्यामुळे बँका, कर्जपुरवठा करणाऱ्या सोसायट्या, तसेच कोर्टाकडून रजिस्टर पोस्टच केले जात असे. त्यामुळे ‘मला संबंधित पत्र मिळाले नाही’ असा कांगावा करता येत नव्हता. ज्या व्यक्तीच्या नावे पत्र आले आहे, ती व्यक्ती अथवा त्यांच्या कुटुंबीयांकडेच ते पत्र दिले जायचे. भारतीय पोस्ट विभागाने काळानुसार काही सेवा आतापर्यंत बंद केल्या. यापूर्वी तार सेवा, आंतरदेशीय पत्र, साधे पोस्टकार्ड यांचा वापर हळूहळू बंद झाला. आता पोस्ट विभागाने नवीन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल यंत्रणांचा वापर करून पोस्ट विभागदेखील स्मार्ट होत आहे.

Advertisement

स्पीड पोस्टचा होणार वापर

रजिस्टर पोस्ट बंद करण्यात येणार असल्याने आता यापुढे त्याजागी स्पीड पोस्टचा वापर केला जाणार आहे. वेगाने पत्र संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचावे, यासाठी स्पीड पोस्टचा वापर होईल. स्पीड पोस्टला ट्रॅकिंग सिस्टीम असल्यामुळे आपले पत्र अथवा वस्तू कुठेपर्यंत पोहोचली आहे, याची माहिती ग्राहकाला घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर नागरिकांना रजिस्टर पोस्टऐवजी स्पीड पोस्टचा वापर करावा लागणार असल्याचे पोस्ट खात्याचे म्हणणे आहे. रजिस्टर पोस्ट का बंद केले जात आहे? याचे कारण मात्र पोस्ट विभागाने दिलेले नाही.

बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सहकारी पतसंस्था, तसेच सोसायट्या आहेत. त्यामुळे कर्ज थकविलेल्या व्यक्तींना बँकांकडून रजिस्टर पोस्टद्वारे पत्र पाठवले जात होते. विशेषत: फेब्रुवारी महिन्यात रजिस्टर पोस्टची संख्या सर्वाधिक असायची. मार्चअखेरपूर्वी कर्जाची वसुली व्हावी यासाठी बँका, तसेच सोसायट्यांचा प्रयत्न असायचा. आता त्यांना स्पीड पोस्टद्वारे आपल्या ग्राहकांना कर्ज थकविल्याची नोटीस पाठवावी लागणार आहे. परंतु, रजिस्टर पोस्टपेक्षा स्पीड पोस्टसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. 20 ग्रॅम वजनाच्या रजिस्टर पोस्टसाठी 26 रुपये मोजावे लागत होते. आता याच वजनाच्या स्पीड पोस्टसाठी 41 रुपये मोजावे लागणार आहेत.

Advertisement
Tags :

.