For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्रिपदासाठी आता विधानपरिषद सदस्यांचेही साकडे

06:22 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्रिपदासाठी आता विधानपरिषद सदस्यांचेही साकडे
Advertisement

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना 24 सदस्यांचे पत्र

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांनी हायकमांडला पत्र पाठवून मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ आता विधानपरिषद सदस्यांनीही मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी हायकमांडला पत्र पाठविले आहे. राज्य मंत्रिमंडळात विधानपरिषदेतील काँग्रेसच्या पाच सदस्यांना स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठी आता कोणती भूमिका घेतात, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमधील प्रथमच विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांनी आपली स्वाक्षरी असणारे पत्र हायकमांडला पाठवून मंत्रिपदे देण्याची विनंती केली होती. आता विधानपरिषदेतील काँग्रेसच्या 24 सदस्यांनी देखील एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठविले आहे. विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहातील किमान 5 सदस्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व द्यावे, अशी विनंती केली आहे. मात्र, याविषयी राजकीय गोटात तर्कवितर्क व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा बाजूला पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बेंगळूरमध्ये विधानपरिषदेच्या काही सदस्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन पत्र सादर केले. मंत्रिमंडळात विधानपरिषद सदस्यांना स्थान नाही. त्यामुळे असमानता आणि निराशेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात किमान पाच विधानपरिषद सदस्यांचा समावेश करावा. विधानपरिषदेतील सदस्य देखील पक्षसंघटनेच्या कार्यात गुंतले आहेत. त्यांनाही प्रतिनिधीत्व देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे पत्रात म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांवरून विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या एकाला, पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातून निवड झालेल्या एका सदस्याला आणि विधानसभेवरून विधानपरिषदेवर निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित सदस्याला मंत्रिपद द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.