रशियातून कच्चे तेलाच्या संभाव्य आयातीत होणार कपात
ब्लूमबर्गच्या अहवालातून माहिती समोर : डिसेंबरमधील स्थिती : 5 प्रमुख कंपन्यांकडून कपातीची घोषणा
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताने डिसेंबर महिन्यासाठी रशियातून कच्च्या तेलाची कमी आयात करण्याचे धोरण राबवले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ब्लूमबर्ग यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली असून देशातील मोठ्या पाच प्रमुख रिफायनर कंपन्यांनी डिसेंबरकरिता कच्च्या तेलाची कोणतीही नवी ऑर्डर दिलेली नसल्याचे समजते.
का घेतला निर्णय
अमेरिकेकडून प्रतिबंधामुळे आणि भारत व अमेरिका व्यापार चर्चेच्या ताज्या पार्श्वभूमीवर सदरचा निर्णय घेतला गेला असल्याचे समजते. ऑगस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियातून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केले होते. अमेरिकेने रशियातील सरकारी तेल कंपनी रोजनेफ्ट आणि लुकॉइल यांच्यासोबतचे सर्व देवाणघेवाणीचे व्यवहारावर निर्बंध लादले. सदरचे व्यवहार निर्बंध हे 21 नोव्हेंबरपासून राहणार आहेत.
या कंपन्यांकडून खरेदी
तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि नयारा एनर्जी यांच्याकडून मात्र डिसेंबरसाठी रशियातून कच्चे तेल खरेदी केले जात असल्याचे म्हटले जात आहे. भारत आता प्रतिबंधानंतर कच्च्या तेलाच्या नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. यावर्षी भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये रशियातून आलेल्या तेलाचे प्रमाण 36 टक्के होते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अमेरिका आणि इतर क्षेत्रांमधून एक जानेवारी ते मार्चपर्यंत 2.4 कोटी बॅरल तेल खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमने सुद्धा जानेवारीसाठी अमेरिका आणि पश्चिम आशियातून 40 लाख बॅरल तेल खरेदी केलेले आहे. सौदी अरामको आणि अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी यांनी कच्च्या तेलाचा पुरवठा विनासायास सुरूच ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
5 कंपन्यांचा निर्धार
देशातील तेल उत्पादक कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज, बीपीसीएल, एचपीसीएल, मंगळूर रिफायनरी आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी यांनी डिसेंबरमध्ये रशियामधून कोणतीही नवी कच्च्या तेलाची ऑर्डर नोंदवलेली नाही. या कंपन्यांकडून भारतामध्ये रशियामधून आतापर्यंत दोन तृतीयांश कच्चे तेल मागवण्यात आले होते.