For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभाव्य पूरस्थिती, नदीकाठ धास्तावला

11:57 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
संभाव्य पूरस्थिती  नदीकाठ धास्तावला
Advertisement

कृष्णेचा प्रवाह दीड लाख क्युसेक : 11 बोटींसह एनडीआरएफ टीम दाखल : आलमट्टी जलाशयातून विसर्ग वाढला

Advertisement

वार्ताहर /एकसंबा

पूरस्थितीशी संघर्ष कराव्या लागणाऱ्या नदीकाठ परिसराला यंदा देखील संभाव्य पूरस्थितीचा सामना करावा लागणार अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे नदीकाठ पुन्हा एकदा धास्तावला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1.3 मीटर इतकी वाढ झाली असून दीड लाख क्युसेकने पाण्याचा प्रवाह येत आहे. तर दूधगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीजवळ आली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची बरसात कायम असून वारणा धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. राजापूर बंधाऱ्यातून 1 लाख 20 हजार 125 क्युसेक, दूधगंगा नदीतून 30 हजार 970 क्युसेक असा एकूण कल्लोळ कृष्णा नदीत 1 लाख 51 हजार 95 क्युसेक इतकी पाण्याची आवक व जावक होत आहे.

Advertisement

सोमवारच्या तुलनेत 29 हजार क्युसेकने पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. परिणामी कल्लोळ येथील नदी काठावरील चार कुटुंबांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारणा धरणातून 3649 क्युसेक तर राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आलमट्टी धरणात 91.928 टीएमसी पाणीसाठा आहे. 1 लाख 28 हजार 763 क्युसेकने आवक होत असून 1 लाख 50 हजार 545 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. चिकोडी तालुक्यातील कृष्णा व दूधगंगा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन 11 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 30 जणांच्या एनडीआरएफ जवानांच्या टीमला देखील पाचारण केले आहे.

Advertisement
Tags :

.