आणखी एक आठवडा पाऊस होण्याची शक्यता
बेंगळूर : राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला असून तो नेहमीपेक्षा अधिक झाला आहे. हवामान अंदाजानुसार आणखी एक आठवडा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात तुरळक पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पाऊस पडत आहे तर इतर ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. परिणामी, फळे, भाजीपाला आणि शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.
म्हैसूर, मंड्या, चिक्कमंगळूर आणि शिमोग्यासह अनेक ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला आहे. शिमोग्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली तर चिक्कमंगळूरमध्ये गारपीट, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी व रात्री काही ठिकाणी तुरळक हलक्मया ते मध्यम पावसाची शक्मयता आहे. एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माहितीनुसार, जानेवारीपासून शनिवारपर्यंत राज्यात सामान्य पाऊस झाला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत पावसाची कमतरता असली तरी राज्यात एकूणच सामान्य पाऊस झाला आहे. या काळात उत्तर कर्नाटकात पावसाची कमतरता असली तरी इतरत्र सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत केवळ कोडगू, यादगीर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर आणि कोलार जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.