राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
धरणांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा
पणजी विशेष प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. आगामी तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दमदार पावसामुळे गोव्यातील जवळपास सर्व धरणांच्या परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाली. अंजुणे धरण आता 60 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात भरले असून या महिन्यात हे धरण भरून जाईल, असा अंदाज आहे.
गोव्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वत्र दमदार पाऊस झाला. मात्र केपे, म्हापसा, काणकोण आणि मडगाव या ठिकाणी अत्यल्प पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस धारबांदोडा येथे पडला. तिथे अडीच इंच नोंद झाली, तर वाळपईमध्ये दोन इंच पाऊस पडला. सांगे, दाबोळी, फोंडा येथे प्रत्येकी दीड इंच, सांखळी येथे एक इंच, तर जुने गोवे, मुरगाव, पेडणे या ठिकाणी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. पणजी आणि केपे येथे प्रत्येकी एक सेंटीमीटर एवढा पाऊस पडला. 24 तासांमध्ये सरासरी एक इंचापर्यंत पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत तो 33 टक्के कमीच आहे.
पाऊस आताशा दमदार पडत असला तरी यंदा पावसाचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळेच राज्यातील धरणे भरायला यावर्षी पावसाचे दोन महिने जावे लागतील. साळावली आणि गावणे ही दोन धरणे भरली. तिळारीमध्ये धरण भरल्याने दरवाजे खुले करणे भाग पडले, तर गोव्यातील एक महत्त्वाचे धरण अंजुणे हे आता 60 टक्केपेक्षा जास्त भरले असून पुढील पंधरा दिवसांमध्ये पाऊस असाच राहिला तर ते भरून जाईल. गोव्यातील सर्वाधिक पाऊस हा अंजुणे धरण क्षेत्रात झालेला आहे. यंदाच्या मोसमात या ठिकाणी 83 इंच पाऊस होऊन देखील धरणात अद्याप 35 टक्के पाणीसाठा कमी आहे. हे गोव्यातले सर्वात उंच धरण असून त्याची उंची 93.20 मीटर एवढी आहे आणि शनिवारपर्यंत या धरणामध्ये 85.35 मीटर एवढे पाणी साचलेले आहे. या धरणामध्ये पाण्याची आवक सध्या वाढत आहे.