For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज,उद्या मुसळधार पावसाची शक्यता

07:04 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आज उद्या मुसळधार पावसाची शक्यता
Advertisement

गावणे धरण भरुन वाहू लागले

Advertisement

त.भा.विशेष प्रतिनिधी

पणजी :गावणेचे धरण भरून वाहू लागले आणि जुलै महिना संपुष्टात आला. पावसाचे प्रमाण अद्याप 34 टक्के कमी आहे. पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये फारच कमी पावसाची नोंद झाली. मान्सून गोव्यात सक्रिय आहे, आज आणि उद्या गोव्यात यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Advertisement

गोव्याच्या दोन्ही बाजूला पाऊस आक्रमक झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्र जोरदार पाऊस चालू असून, आता केरळमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देऊन तिथे काही भागात ऑरेंज तर काही भागात रेड अलर्ट जारी केले आहे. त्याचा परिणाम गोव्याच्या हवामानावर झाला असून गोव्यात सध्या जोरदार वादळी वारे वाहत आहेत. पावसाचा जोर गोव्यात दोन दिवसात वाढण्याची शक्यता आहे. ऐन जुलैमध्ये अपेक्षेपेक्षाही कमी पाऊस यंदा पडला परिणामी अद्याप 51 इंच पावसाची नोंद आहे. एव्हाना गोव्यात 78 इंच पाऊस पडणे आवश्यक असते.

यंदा कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे 34 दिवसानंतर साळावली धरण भरून वाहू लागले. त्या पाठोपाठ शुक्रवारी गावणे धरण देखील भरून वाहू लागले. इतर धरणांची परिस्थिती देखील अतिशय चांगली आहे. अंजुणे धरणामध्ये 58 टक्के पाणी आहे. आमठाणेमध्ये 82 टक्के, चापोलीत 63 टक्के तर महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या तिळारी धरणामध्ये 84 टक्के पाणी आहे आणि या धरणाचे दरवाजे खोलण्यात आले आहेत. गोव्यातील धरणांपैकी सर्वाधिक पाऊस हा अंजुणे धरण क्षेत्रात 81 इंच पाऊस पडून देखील या धरणामध्ये अद्याप 58 टक्केच पाणीसाठा आहे. इतर ठिकाणी कमी पाऊस पडून देखील धरणे भरलेली आहेत. तिळारी धरण क्षेत्रामध्ये 90 इंच पावसाची आतापर्यंत विक्रमी नोंद झालेली आहे. साळावलीमध्ये आतापर्यंत 76 इंच पाऊस पडला. आमठाणेमध्ये केवळ 45 इंच तर चापोली धरण क्षेत्रात 43 इंच पावसाची नोंद झालेली आहे.

Advertisement
Tags :

.