‘वनडे’मध्ये दोन चेंडूंच्या वापराचा नियम बदलण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांच्या बाजूने जास्त झुकत असल्याच्या दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 50 षटकांच्या क्रिकेटमधील दोन चेंडूंच्या वापराचा नियम बदलू शकते, अशी माहिती मिळाली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने एकदिवसीय सामन्यामध्ये एका डावात एकच चेंडू वापरण्याची शिफारस केली आहे.
एका डावात दोन नवीन चेंडू वापरण्याचा नियम गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. तो मोडीत निघण्यासाठी आयसीसी संचालक मंडळाने वरील शिफारसीला मान्यता देणे आवश्यक आहे. आयसीसी बोर्ड आज रविवारी हरारे येथे होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा करेल. सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन पांढरे कुकाबुरा चेंडू वापरले जात आहेत. गोलंदाज प्रत्येक बाजूने वेगळे नवीन चेंडू वापरतो, त्यामुळे चेंडू टणक राहून फलंदाजांना मुक्तपणे धावा काढता येतात. त्यातच क्षेत्ररक्षणावर निर्बंध (30 यार्डांच्या वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक) राहत असल्याने फलंदाजांना गोलंदाजांपेक्षा जास्त फायदा मिळतो.
सचिन तेंडुलकरनेही अनेकदा दोन नवीन चेंडूंच्या परिणामांवर भाष्य केलेले आहे. दोन चेंडूंचा वापर केल्याने खेळात रिव्हर्स स्विंग दिसणे बंद झाले आहे. कारण चेंडू खडबडीत व रिव्हर्स स्विंग होण्यासाठी किमान 35 षटके जुना असणे आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येक बाजूने नवीन चेंडू वापरले जातात तेव्हा संपूर्ण सामन्यात एक चेंडू फक्त 25 षटकांसाठी वापरला जातो. यामुळे गोलंदाजाकडून फलंदाजाला रिव्हर्स स्विंगने आव्हान देण्याची संधी हिरावून घेतली जाते. त्याचा परिणाम फिरकीपटूंवरही होतो. कारण त्यांना नवीन चेंडूने फिरकी टाकण्यास त्रास होतो. 25 व्या षटकापर्यंत दोन चेंडू वापरायचे आणि त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर दोन चेंडूंपैकी एक वापरण्याचा पर्याय ठेवायचा असाही मार्ग यावर काढला जाण्याची शक्यता आहे.