मळेवाड जंक्शन येथील धोकादायक रस्त्यामुळे अपघाताची शक्यता
महिन्याभरापूर्वीचे डांबरीकरण उखडल्याने कामावर प्रश्नचिन्ह
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड जंक्शन येथील कोंडुरेकडे जाणार रस्ता तसेच मळेवाड पुलानजीकच्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून,या रस्त्यावर मागील महिन्यातच खडीकरण ,डांबरीकरण झाले होते.मात्र सध्यस्थितीत पाहता पावसाने उसंत घेताच या रस्त्यावरील खडीकरण डांबरीकरण केलेला रस्ता अक्षरशः उखडून येथील खडी रस्त्यावर पसरली असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना,पादचाऱ्यांना अक्षरश: त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील डांबर वितळून ते गाडीच्या चाकांना लागून अधिकच खडी उखडून सद्या रस्ता खड्डेमय झाला आहे.अचानक ब्रेक लावल्याने वाहनचालकांची तारांबळ उडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वितळलेल्या डांबरामुळे रस्त्यावर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. खडी रस्त्यावर पसरली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे संबंधित विभागाने,ठेकेदाराने याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करून पुढील होणारी दुर्घटना टाळावी ही ग्रामस्थांची ,वाहनचालकांची मागणी आहे.