घोटगेवाडी प्रशालेची इमारत मोजतेय अखेरच्या घटका
इमारत निर्लेखित करा ; अन्यथा कायदा हातात घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा
दोडामार्ग – वार्ताहर
घोटगेवाडी गावातील पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेची इमारत अखेरच्या घटका मोजत आहे. गावातील जवळपास १५० वर्षापूर्वीची जुनी, जीर्ण इमारत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही इमारत निर्लेखित करावी. अन्यथा पुढील अनर्थ टाळण्यासाठी ग्रामस्थच कायदा हातात घेतील असा इशारा उपसरपंच सागर कर्पे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, घोटगेवाडी येथे दहा वर्षांपूर्वी प्रशालेची नवीन इमारत बांधल्याने पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेची जुन्या इमारतीचा पहिला निर्लेखित प्रस्ताव शालेय शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाकडे पाच वर्षांपूर्वी व पुन्हा दुसरा प्रस्ताव ऑगस्ट २०२४ मध्ये पाठविला. परंतु , याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, गावचे सरपंच श्रीनिवास शेटकऱ आणि उपसरपंच सागर कर्पे हे सुद्धा वर्षभर सतत पाठपुरावा करीत असून प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. य शाळेला लागून असलेल्या नवीन इमारतीमध्ये पहिली ते सातवी पर्यंत शिक्षणाचे धडे दिले जातात. त्या ठिकाणी ४७ मुले शिकत असून, मुख्याध्यापकासह चार शिक्षक उपलब्ध आहेत. या शाळेचा नावलौकिक सुद्धा मोठा आहे. या शाळेने कितीतरी शिक्षक घडविले आहेत. मात्र, आता जुनी इमारत पूर्ण जीर्ण झाली असून सर्वांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. इमारत निर्लेखित करण्याबाबत त्रुटी दूर करत दोन प्रस्ताव पाठवून सुद्धा प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. शाळेला लागूनच मागील दहा वर्षापूर्वी नवीन इमारत बांधलेली आहे. तेथे सध्या शाळा भरते. शिवाय अंगणवाडी सुध्दा असल्याने तेथे १४ ते १५ चिमुकले शिकत आहेत. या मुलांचा जुन्या इमारतीच्या आजुबाजूला सतत वावर असतो. ती खेळत, बागडत असतात. जुन्या इमारतीचे कौले पडत झाली असून भिंतीना मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात फार मोठा अपघात होण्यापूर्वीच ही इमारत निर्लेखित करणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन एखादा शिक्षक किंवा चिमुकल्याचा बळी जाण्याची वाट पाहते काय? असा संतप्त सवाल पालक वर्ग विचारत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला असून ही इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत इमारतीच्या निर्लेखनाबाबत कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ पुढील अनर्थ टाळण्यासाठी कायदा हातात घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता निर्णय घ्यावा अशी मागणी उपसरपंच सागर कर्पे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.