दुसऱ्या सत्रात बाजारात सकारात्मक रिकव्हरी
सेन्सेक्स 535 अंकांनी मजबूत निफ्टी पोहोचली 22,957 वर : सलगच्या घसरणीनंतर बाजाराचा दिलासा
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी मागील काही सत्रांमधील सुरु असलेल्या घसरणीला पूर्ण विराम दिला आहे. यातून बाजाराने सकारात्मकपणे रिकव्हरी प्राप्त केल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. मागील दोन दिवसांच्या सलगच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजीचा मोहोल दिसून आला. मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा जोमाने उभारले. सकाळी बाजार सुरु झालेवर 75,659.00 वर खुला झाला होता. ट्रेडिंगच्या दरम्यान हा 76,512.96 च्या उच्चांकावर पोहोचला होता. परंतु दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 535.24 अंकांनी वधारुन निर्देशांक 75,901.41 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 128.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,957.25 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, झोमॅटो, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी आणि भारती एअरटेल यांचे मुख्य समभाग वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयटीसी, एचसीएल टेक, पॉवरग्रिड , नेस्ले इंडिया, टाटा कंसल्टेंसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग प्रभावीत झाले.
निफ्टीमधील 28 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, श्रीराम फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग 4.32 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तसेच सनफार्मा, हिंडाल्को, ब्रिटानिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रासिम यासारखे समभाग प्रभावीत होत बंद झाले.
या क्षेत्रांची कामगिरी
बाजारात बँकिंगची कामगिरी सकारात्मक राहिली. बँक निफ्टी, पीएसबी आणि खासगी बँकांचे समभाग 1 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले. तसेच निफ्टीमधील निफ्टी रियल्टी निर्देशांक 2 टक्क्यांनी तर फायनाशिअल सर्व्हिसेज आणि वाहन निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिकने तेजीत राहिला. आशियातील बाजारांमध्ये टोकीयोचा बाजारात घसरणीसह बंद झाला. तसेच हाँगकाँगचा बाजार तेजीत राहिला. तसेच सियोल आणि शांघाय बाजाराला सुट्टी होते. युरोपीयन बाजारात सुरुवातीला तेजीत राहिला होता.