अर्जुनरावांकडून सर्वसामान्यांना सकारात्मकतेची ऊर्जा
जन्मशताब्दी सोहळ्यात शरद पवार यांचे गौरवोद्गार : सहकाराच्या जोरावर बेळगावात उत्तुंग कामगिरी केल्याचा दावा
बेळगाव : सहकार कायद्यान्वये देशातील पहिली सहकारी सोसायटी बेळगावच्या बेल्लद बागेवाडी येथे स्थापन झाली. खेड्यापाड्यातील लोकांना एकत्रित आणून त्यांचा आर्थिक विकास साधण्यात सहकाराचा मोठा वाटा आहे. कै. अर्जुनराव घोरपडे यांनी बेळगावमधील लोकांना एकत्र आणून सहकाराच्या जोरावर उत्तुंग कामगिरी बजावली. केवळ सहकारच नाही तर शिक्षण, उद्योग व इतर क्षेत्रांमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केले. सहकारातून सकारात्मक बदल कसा करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.
सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळा सोमवारी मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सरकारचे निवृत्त अधिकारी दिनेश ओऊळकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरपर्सन भाविकाराणी होनगेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील होते.
ते पुढे म्हणाले, शामराव देसाई, भुजंगराव दळवी यासारख्या सहकाऱ्यांचे सहकार्य त्यांनी मिळाल्याने त्यांनी सहकार क्षेत्राचे परिवर्तन केले. केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही तर त्यावर आधारीत उद्योग, लहानमोठे व्यवसाय सुरू करण्यास त्यांनी प्रेरणा दिली. त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी बँकेच्या सहाय्याने आर्थिक मदत देवू केली. त्यामुळे बेळगाव परिसरात अनेक उद्योजक निर्माण होऊ शकले, असे विचार शरद पवार यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये 5 लाख कोटींच्या ठेवी
महाराष्ट्राप्रमाणेच बेळगावमध्येही सहकार क्षेत्र रूजत गेले. त्यामुळेच आज येथे आज अनेक अर्बन व सहकारी बँका उभ्या राहिल्या. बेळगावमधील प्रमुख 6 वित्तीय संस्थांकडे 5 लाख 50 हजार कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. तसेच त्यांचा एनपीए देखील चांगला असल्याने सहकारी क्षेत्रासाठी हे महत्त्वाचे आहे. परंतु आता या संस्थांनी डिजिटल सेवा देवून अधिकाधिक तरुण वर्ग आपल्याकडे वळवून घेण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला दिनेश ओऊळकर यांनी सहकारी संस्थांना दिला.
प्रारंभी शरद पवार यांच्या हस्ते मराठा मंदीर नुतनीकरण कामाची कोनशिला व अर्जुनराव घोरपडे सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘स्मृतीगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाळाराम पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून घोरपडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविक मालोजी अष्टेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद मेणसे यांनी केले. आप्पासाहेब गुरव यांनी आभार मानले.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणला
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मराठा मंदिर सभागृहात आगमन होताच सीमावासियांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. ‘बेळगाव कारवार, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में....’ अशा घोषणांनी परिसर दणाणला. पवार यांनी भाषणाला सुरूवात करताच पुन्हा घोषणा देत सीमावासियांनी आपला आवाज बुलंद केला.