हद्दवाढी संदर्भात मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय अपेक्षित
आमदार राजेश क्षीरसागर यांचा विश्वास
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास धरणं
सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण : कृती समितीचा इशारा
कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज (२४ मार्च) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक होत आहे. या बैठकीत हद्दवाढीसंदर्भातील आपली भूमिका ठामपणे पटवून देवू. त्यामुळे या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे धरणे आंदोलन झाले. या आंदोलनास्थळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापुर शहराची हद्दवाढ अनेक वर्षापासून रखडली आहे. हद्दवाढीसाठी आंदोलने सुरु आहेत. हद्दवाढीच्या मागणीसाठी हद्दवाढ कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर समितीने या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तासाचे धरणे आंदोलन केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. ते म्हणाले,
आज (२४ मार्च ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संबंधित विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी यांची विधानभवनात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत हद्दवाढीबाबत भक्कम बाजू मांडून भूमिक पटवून देवू. यामुळे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील आणि हद्दवाढीचे पहिले पाउल पडेल असा विश्वास व्यक्त केला.
शहराच्या विकासासाठी हद्दवाढी शिवाय पर्याय नाही. टोल आंदोलनात ग्रामीण भागातील जनतेचाही सहभाग होता. यामुळे हदवाढीच्या प्रश्नासंदर्भात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची गरज आहे. हद्दवाढ ग्रामीण भागासाठी सुद्धा विकासात्मक आहे. त्यांच्या जमिनीला चांगला भाव येणार आहे. ग्रामीण भागातील लोकाशी संवाद साधण्याची गरज आहे. हदवाढ विरोधकांना हद्दवाढीचे महत्व पटवून सांगण्याची गरज आहे असे क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापुर शहर हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आणि माजी महापौर आर.के.पोवार म्हणाले, हद्दवाढीसाठी अनेक वर्ष मागणी करत आहे. हद्दवाढीच्या बाबतीत कोल्हापूर राज्यात पाचव्या क्रमांकावरून तेराव्या क्रमांकावर गेले आहे. हदवाढ झाली नाही तर बेमुदत उपोषणाला बसणार. बाबा पार्टे म्हणाले, शहराची हद्द होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. बाबा इंदुलकर म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ जिह्याच्या विकासासाठी हवी आहे. आजच्या या आंदोलनात 1972 सालापासूनचे नगरसेवक उपस्थित नाहीत. ज्यांनी पदे भोगली त्यांनी या यासाठी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. तर हदवाढ विरोधक चर्चा करण्याऐवजी वेगळी चूल मांडतात अशी टीका त्यांनी केली. आमदार राजेश क्षीरसागर वगळता अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधी हद्दवाढीसाठी प्रयत्न केले नाहीत. यामुळे असे लोक हद्दवाढीच्या बाजूने नाहीत अशी शंका आहे. हद्दवाढी संदर्भात आमची नेहमी सामंजस्याची भूमिका आहे. प्रसंगी हद्दवाढीसाठी प्राणांतिक उपोषण करणार.
दिलीप देसाई म्हणाले हद्दवाढी संदर्भात सरकारने जनसुनावणी घ्यावी. काही नेते, सर्व लोक आपल्या मुठीत असल्यासारखे वागत आहेत.
हदवाढीचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूकही होऊ देणार नाही. खासदार, आमदारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. यापूर्वी एका आमदाराने टोल आंदोलनाची पावती फाडली त्याचे काय परिणाम झाले हे दिसून आले. भारत काळे यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध केला. अनिल घाटगे म्हणाले, हद्दवाढीसाठी दिलीप देसाई, बाबा इंदुलकर यांना उपोषण करायला लागू नये. सोमवारच्या मुंबईतील बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपाचे महेश जाधव यांनी हद्दवाढ झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. आभार अशोक भंडारे यांनी मानले.
या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव,शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, शशिकांत बिडकर, आपचे संदीप देसाई, माजी नगरसेवक अनिल कदम , शिवाजी जाधव,गायत्री राऊत,पद्मा तिवले, नीलिमा व्हटकर,राजसिंह शेळके, शाहीर दिलीप सावंत,सुभाष देसाई,किशोर घाटगे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
लोकप्रतिनिधी लक्ष्य
धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले.आमदार राजेश क्षीरसागर वगळता अन्य लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली.यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले.